...पॉलिटिकल ‘साहित्य सेवा’
By admin | Published: February 7, 2017 01:34 AM2017-02-07T01:34:47+5:302017-02-07T01:34:47+5:30
साहित्य संमेलनाचं वारं राजकीय क्षेत्रातही शिरलं. काही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ‘पॉलिटिकल साहित्य संमेलन’ घेण्याची घोषणा केली.
साहित्य संमेलनाचं वारं राजकीय क्षेत्रातही शिरलं. काही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ‘पॉलिटिकल साहित्य संमेलन’ घेण्याची घोषणा केली. याचं निमंत्रण देण्यासाठी हे यजमान कार्यकर्ते काही नेत्यांना भेटले, तेव्हा त्यांच्यात झालेला साहित्यिक संवाद जश्शाऽऽचा तस्साऽऽ सादर... सर्वप्रथम कार्यकर्त्यांची टीम बारामतीत पोहोचली.
पहिला कार्यकर्ता : दादाऽऽ नमस्कार. संमेलनात तुम्ही तुमचे ‘महान’ विचार प्रकट करावेत, ही आमची विनंती...
अजितदादा : (खुशीत) का नाही? साक्षात ‘सरस्वती देवी’च माझ्या जिभेवर प्रसन्न, पण कशावर बोलू? कोरड्या धरणावर प्रक्षोभक कविता करू की घसरणाऱ्या जिभेवर चिंताजनक प्रबंध सादर करू?
(डोकं खाजवत कार्यकर्ते कऱ्हाडात.)
दुसरा कार्यकर्ता : बाबाऽऽ गुड मॉर्निंग. संमेलनात तुम्ही कोणत्या विषयावर प्रकट मुलाखत द्याल?
पृथ्वीराज बाबा : (कपाळावरचे केस मागं सरकवत) ‘सत्तेचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच पंधरा दिवस अगोदर माझी खुर्ची खेचणाऱ्यांची सूडबुद्धी’ या विषयावर बोलेन मी.
तिसरा कार्यकर्ता : (विचित्र चेहऱ्यानं) या विषयावर गेल्या अडीच वर्षांत तुम्ही हज्जारऽऽदा बोललात. आता जरा नवा विषय बघा कीऽऽ
(टीम मग ‘मातोश्री’वर.)
चौथा कार्यकर्ता : छोटे अध्यक्ष... पप्पा आहेत का आत? साहित्य संमेलनाचं निमंत्रण द्यायला आलोय.
आदित्य : (उत्सुकतेनं) पण कोणतं साहित्य म्हणता? आमच्या पेग्वीनला जगविण्याचा नवा खाऊ आहे की काय तुमच्या पिशवीत? दाखवा बघू मला हे साहित्यऽऽ
उद्धो : (आतून बाहेर येत) आता ऐन निवडणुकीत ‘पेग्वीन’चं भूत उकरून काढू नका आदित्य. साहित्य म्हणजे ‘दात पाडण्याचा हातोडा अन् पाठीत खुपसण्याचं खंजीर’ असावा.
(टीम ‘सदाभाऊं’च्या बंगल्यात.)
पाचवा कार्यकर्ता: ‘आंदोलनातील साहित्यिक भाषा’ यावर आपण भाषण कराल का संमेलनात?
सदाभाऊ : (गोंधळून दाढी खाजवत) आंदोलन म्हंजी काय.. त्ये कसं करतात, कुठंशी करतात? मला तर कायबी आठवत नाय. थांबा. आमच्या शेट्टींना ईचारतो. (मोबाइल कानाला लावत) हॅल्लूऽऽ हे आंदोलन कशाशी खातात? (मात्र तिकडूनही समाधानकारक उत्तर न आल्यानं गुबगुबीत गादीत रिलॅक्समध्ये बसत) कार्यकर्त्यांनो, सध्या म्या लईऽऽ बिझी हाय. तवा माढ्याच्या इलिक्शनमंदी फिरलेली माजी आॅडिओ क्लिप संमेलनात वाजवा. लईऽऽ भारी साहित्य हाय बगा त्यात. (घाम पुसत कार्यकर्ते बीडमध्ये.)
सहावा कार्यकर्ता : संमेलनात तुम्ही बोलू शकाल काय ताई?
पंकजाताई : (‘वर्षा’ बंगल्याकडं बघत) अलीकडं मी बोलणंच टाळतेय, नाहीतर माझाही नाथाभाऊ व्हायचा! तरीही मी नक्की येईन. मात्र, दोन गोष्टी लक्षात ठेवा. मंडप मजबूत पाहिजे बसायला.. अन् भरपूर चिक्की...
(कार्यकर्ते ‘कृष्णकुंज’वर.)
सातवा कार्यकर्ता : तुम्ही तर साहित्यातले दर्दी नेते म्हणे.. मग येणार ना आमच्या संमेलनाला?
राज : नक्की. नक्की. साहित्याचा आमच्याशी तसा खूप जवळचा संबंध. (‘राईट हॅण्ड’कडं वळून बघत) बाळाऽऽ ‘दगडं, काठ्या अन् हॉकी स्टिक’ साहित्याचा पुरवठा करा बघू तातडीनं संमेलनाला. नेहमीप्रमाणं छानपैकी खळ््ळखट्याऽऽक आवाज आला पाहिजे आपल्या सर्व साहित्याचा!
- सचिन जवळकोटे