राजकीय खेळी होत राहतील, मला थांबलेले सरकार गतिमान करायचे आहे! CM शिंदेंची फटकेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 09:55 AM2022-09-06T09:55:49+5:302022-09-06T09:56:53+5:30
लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले, मी तुम्हाला पत्रकार म्हणून ओळखत होतो. तुम्ही चित्रकारही आहात. त्यावर विजय दर्डा यांनी, तुम्ही राजकीय क्षेत्रातील अनोखे कलाकार आहात, असे म्हणतात. त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
मुंबई : राजकीय खेळी होत राहतील. मला महाराष्ट्रात थांबलेले सरकार गतिमान करायचे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार शाब्दिक फटकेबाजी केली. निमित्त होते जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आयोजित ‘फोर स्टोरीज’ चित्रप्रदर्शनाच्या समारोपाचे. तब्बल पन्नास मिनिटे मुख्यमंत्री शिंदे जहांगीर आर्ट गॅलरीत होते. यावेळी त्यांनी चित्रांची पाहणी केली.
लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले, मी तुम्हाला पत्रकार म्हणून ओळखत होतो. तुम्ही चित्रकारही आहात. त्यावर विजय दर्डा यांनी, तुम्ही राजकीय क्षेत्रातील अनोखे कलाकार आहात, असे म्हणतात. त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मी कसला कलाकार..? मी फक्त माझी थोडी कलाकारी दाखवली, अशी परतफेड मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. कोणतेही पद कायम नसते. मी कायम जमिनीवरून चालणारा माणूस आहे. विदर्भाचा आणि मागास भागाचा समतोल विकास हे माझे ध्येय आहे. मुख्यमंत्री येतात आणि जातात. लोक केलेले काम लक्षात ठेवतात. तुम्ही लोकांसोबत कसे वागलात, हेही लक्षात ठेवतात. आपण लोकांसाठी काही करू शकतो, म्हणून लोक आपल्याकडे येतात. अशावेळी आपण तुसडेपणाने वागणे बरोबर नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. त्यांच्या या फटकेबाजीचा रोख उपस्थितांना कळाला नसेल तर नवल.
या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणारा निधी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमासाठी दिला जाणार आहे. जो गडचिरोली जिल्हा मुख्यमंत्र्यांनी, मंत्री असताना दत्तक घेतला होता त्या ठिकाणच्या शहीद पोलिसांच्या मुलांच्या शिक्षणासाठी चित्रांच्या विक्रीतून मिळणारा निधी खर्च केला जाणार आहे, असे विजय दर्डा यांनी सांगितले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनीदेखील एक पेंटिंग विकत घेत माझाही तुमच्या कार्यात सहभाग आहे, असे सांगून स्वतःच्या दिलदारपणाचे उदाहरण दिले. तुमच्या घरात सगळेच लोक उत्तम कलावंत आहेत आणि सगळ्यांनी अतिशय सुंदर चित्र काढली आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी सर्व कलाकारांच्या वतीने अनोखा बुके त्यांना भेट देण्यात आला. चित्र प्रदर्शन पाहून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाहण्यासाठी दुतर्फा गर्दी जमली होती. मुख्यमंत्री शिंदे दोन्ही बाजूला लोकांमध्ये गेले. त्यांना हात दाखवून अभिवादन केले. त्याचीही जहांगीर आर्ट गॅलरी परिसरात चर्चा रंगली होती.