खोपोली निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी

By Admin | Published: July 19, 2016 02:41 AM2016-07-19T02:41:53+5:302016-07-19T02:41:53+5:30

खोपोली नगरपालिकेच्या २९ जागांसाठी होणारी निवडणूक काही दिवसांवर आली आहे.

Political parties' frontline for Khopoli elections | खोपोली निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी

खोपोली निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी

googlenewsNext


खालापूर : खोपोली नगरपालिकेच्या २९ जागांसाठी होणारी निवडणूक काही दिवसांवर आली आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवार तयारीला लागले असून, राजकीय पक्षांनीही मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.
सध्या खोपोली नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असून, अपक्ष नगरसेवकांच्या मदतीने गेली पाच वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या राष्ट्रवादीला सत्ता टिकविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. राष्ट्रवादीचे खोपोलीत १३ नगरसेवक असून, नगराध्यक्ष पदावरून राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे चित्र आहे. विकासकामांच्या नावाने बोंबच असल्याने मतदारांना अन्य पक्षांचा पर्याय समोर आहे. खालापूरमध्ये चमत्कार करणाऱ्या शेकापक्षाला यामध्ये अधिक संधी असल्याचे चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे. शिवसेना, भाजपा, आरपीआय, मनसे, काँग्रेस या पक्षांच्या निवडणुकीतील कामगिरीकडेही लक्ष राहणार असून, सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
खोपोली नगरपालिकेच्या नगरसेवक पदांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर साऱ्यांनाच वेध लागले आहेत. नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाचे भाजपा, शिवसेना सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार नगराध्यक्ष जनतेमधून निवडला जाणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. या अगोदर खोपोलीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले होते. त्या दृष्टीने अनेकांनी तयारी सुरू केली असतानाच शासनाने नगराध्यक्ष जनतेमधून निवडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण बदलण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
खोपोलीचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण राहील, असा विश्वास असल्याने इच्छुक उमेदवार तयारीला लागले असून, अनेकांनी जोरदार संपर्क मोहीमही सुरू केली आहे. नगराध्यक्षपद सर्वसाधारण राहिले तर राष्ट्रवादीकडून पुन्हा विद्यमान नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर रिंगणात राहण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून शहरप्रमुख सुनील पाटील, काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष बेबीशेठ सॅम्युअल, शेकापकडून विरोधी पक्षनेते तुकाराम साबळे यांच्या नावांची चर्चा आहे.
खोपोलीचा विकास रखडल्याने विद्यमान सत्ताधाऱ्यांविरोधात मोठा असंतोष आहे. तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे व आ. सुरेश लाड यांनी खोपोलीसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला असतानाही खोपोलीत एकही मोठे काम उभे राहिलेले नाही. नाट्यगृहाची इमारत पूर्णत्वाकडे असली तरी अनेक वर्षांपासून हे काम रखडले होते. सध्या या इमारतीला उद्घाटनाची प्रतीक्षा आहे.
खालापूरमध्ये मतदारांनी शेकापक्षाला पूर्ण बहुमत दिले आहे. गेली पाच वर्षे विरोधी पक्षात असलो तरी आम्ही केलेली विकासकामे लोकांसमोर आहेत. आमदार जयंत पाटील यांचे खोपोलीशी वेगळे नाते आहे. त्यामुळे खोपोलीकर शहराचा विकास करण्यासाठी शेकापला पूर्ण बहुमत देतील, असा विश्वास असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
- तुकाराम साबळे,
विरोधी पक्षनेते, खोपोली नगर परिषद

Web Title: Political parties' frontline for Khopoli elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.