राजकीय पक्षांनी पदवीधर निवडणूक लढविणे हा राज्य घटनेचा अपमान
By admin | Published: January 22, 2017 08:47 PM2017-01-22T20:47:17+5:302017-01-22T20:47:17+5:30
राज्य घटनेमध्ये पदवीधर निवडणूक सुशिक्षित पदवीधर व्यक्तीने लढवावी आणि त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसावा
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 22 - राज्य घटनेमध्ये पदवीधर निवडणूक सुशिक्षित पदवीधर व्यक्तीने लढवावी आणि त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसावा, असे स्पष्ट केले असतानाही राजकीय पक्ष घटनेचा अपमान करीत आहेत. राजकीय पक्षांनी पदवीधर निवडणुकीपासून दूर राहिले पाहिजे; परंतु गत काही वर्षांपासून राजकीय पक्षांनी पदवीधर निवडणुकीत शिरकाव केला आणि स्वत:च्या सत्तेला बळकट करण्यासाठी व्होट बँकेचे राजकारण सुरू केले. हा राज्य घटनेचा अपमान आहे, असे स्पष्ट मत विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अॅड. श्रीहरी अणे यांनी रविवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.
पदवीधर निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून डॉ. अविनाश चौधरी यांना विदर्भ राज्य आघाडीचे समर्थन जाहीर करण्यासाठी अॅड. अणे अकोल्यात आले होते. पदवीधर मतदारसंघामध्ये डॉ. अविनाश चौधरी यांना समर्थन जाहीर करताना, त्यांनी डॉ. चौधरी हे विदर्भ राज्य आघाडीचे उमेदवार नाहीत. डॉ. चौधरी निवडून आल्यास, ते कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाहीत. विधान परिषदेमध्ये स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी ते आवाज उठवतील. या मुद्द्यावर विदर्भ राज्य आघाडीने त्यांना समर्थन दिले आहे. पदवीधर निवडणूक ही स्वतंत्र निवडणूक आहे. उच्चशिक्षित मतदारांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी, त्यांच्या समस्या मांडण्यासाठी त्यांना त्यांचा प्रतिनिधी द्यावा लागतो. या निवडणुकीत राजकीय पक्षांशी उमेदवाराचा संबंध नसावा, अशी घटनेत तरतूद आहे; परंतु दुर्दैवाने राजकीय पक्षांचा पदवीधर निवडणुकीत शिरकाव झाला. राजकीय पक्ष स्वत:च्या चिन्हांचा पदवीधर निवडणुकीत वापर करतात आणि त्याला राजकीय रंग देतात, हे घटनाविरोधी आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमांचीसुद्धा पायमल्ली होत आहे, असे सांगत, अॅड. श्रीहरी अणे यांनी यासंदर्भात अपक्ष उमेदवार डॉ. अविनाश चौधरी हे निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला डॉ. अविनाश चौधरी, अनिल जवादे, नीरज खांदेवाले, श्रीकांत तराळ उपस्थित होते.
स्वतंत्र विदभार्बाबत भाजप उदासीन
भाजप आणि काँग्रेसचा स्वतंत्र विदर्भास विरोध आहे. निवडणुका आल्या, की भाजपला स्वतंत्र विदर्भ राज्याची आठवण होते. भाजप सत्तेवर असेपर्यंत विदभार्ची निर्मिती शक्य नाही. काँग्रेस तर स्वतंत्र विदभार्ला कायमच विरोध करीत आहे. त्यामुळेच आपण विदर्भ राज्य आघाडी पक्षाची स्थापना केली. पक्ष काढणे ही सोपी बाब नाही; परंतु विचाराअंती घेतलेला हा निर्णय आहे, असेही अॅड. श्रीहरी अणे यांनी सांगितले.