डाळीला राजकीय फोडणी

By admin | Published: November 7, 2015 03:01 AM2015-11-07T03:01:50+5:302015-11-07T03:02:31+5:30

तूरडाळीच्या भाववाढीवरून राज्यभर सरकारच्या नावाने ऐन दिवाळीत शिमगा होत असतानाच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यावर टीकेची फोडणी दिली. आजवर डाळीच्या उत्पादनात

Political turf in pulses | डाळीला राजकीय फोडणी

डाळीला राजकीय फोडणी

Next

बारामती : तूरडाळीच्या भाववाढीवरून राज्यभर सरकारच्या नावाने ऐन दिवाळीत शिमगा होत असतानाच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यावर टीकेची फोडणी दिली. आजवर डाळीच्या उत्पादनात महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळविला होता; मात्र आता सणाच्या काळात डाळ महागली आहे, अशी कोपरखळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मारली. त्यावर फडणवीस यांनीही लगेच पलटवार केला. आधीच्या सरकारने ‘नाफेड’च्या माध्यमातून हमीभावाने तुरीची खरेदी न केल्यामुळे शेतकऱ्यांनी डाळवर्गीय पिकांचे उत्पादन कमी केले. त्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचे सांगितले.
बारामतीच्या कृषी विकास प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या ‘कृषिक’ या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. गहू, कापूस, साखर उत्पादनात देश सक्षम आहे. मात्र, डाळी व खाद्यतेलात आपण मागे आहोत. हे उत्पादन वाढविण्यासाठी मुख्यमंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा पवार यांनी भाषणात नोंदविली. त्यावर डाळी व तेलबियांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी राज्य शासनाने विशेष योजना अमलात आणण्याचे ठरविले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती देण्यासाठी राज्यातील १ हजार ५९ मंडल कृषी कार्यालयांच्या अंतर्गत हवामान केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

पवारांचे सारथ्य!
शरद पवार अध्यक्ष असलेल्या संस्थांच्या कार्यक्रमांना वर्षभरात भाजपाच्या बड्या नेत्यांनी हजेरी लावली आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरादेखील राजकीय पटलावर चर्चेचा होता. मात्र, कार्यक्रमात राजकीय भाष्य टाळले गेले. ‘कृषिक’ प्रदर्शनाची पाहणी फडणवीस यांनी बॅटरीवर चालणाऱ्या गाडीत बसून केली. या गाडीत समोरच्या बाजूला पवार तर पाठीमागे मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे होते. त्यामुळे सरकारचे सारथ्य पवार तर करत नाहीत ना, अशी मिश्कील टिप्पणी उपस्थितांमधून झाली.

पाण्याला विरोध करणे चुकीचे - पवार
पाऊस कमी पडल्याने राज्याच्या अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती आहे. मराठवाड्याला पाणी देण्यास काही ठिकाणी विरोध केला जात आहे, हे चुकीचे आहे. परिस्थिती गंभीर असताना पिण्याच्या पाण्याला विरोध न करता माणुसकीचे दर्शन घडवले पाहिजे, असा सल्ला पवार यांनी नगर व नाशिकच्या नेत्यांना दिला.

Web Title: Political turf in pulses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.