शरद पवारांचा फोन अन् दिल्लीत महिनाभरात मोठी राजकीय उलाढाल?; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 17:42 IST2024-08-02T17:39:59+5:302024-08-02T17:42:05+5:30
गेल्या २ दिवसांपासून एनडीएतील घटक पक्ष जेडीयू, जेडीएस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर आल्या. त्यात शरद पवारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

शरद पवारांचा फोन अन् दिल्लीत महिनाभरात मोठी राजकीय उलाढाल?; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
पंढरपूर - दिल्लीत पुढील १ महिन्यात मोठी उलाढाल होणार आहे असं शरद पवारांनी सांगितल्याचे शेकापचे नेते जयंत पाटील यांना दावा केला आहे. पंढरपूरात शेतकरी कामगार पक्षाचे अधिवेशन सुरू आहे. या कार्यक्रमाला शरद पवार हजेरी लावणार होते मात्र दिल्लीत महिनाभरात मोठ्या घडामोडी घडणार असून त्यासाठी दिल्लीत थांबावं लागत असल्याचं पवारांनी फोनवरून सांगितलं असं जयंत पाटलांनी भाषणात उल्लेख केला.
पंढरपूर इथल्या शेकापच्या अधिवेशनात जयंत पाटील म्हणाले की, या देशाचे नेते शरद पवारसाहेब या कार्यक्रमाला येणार होते. परवा त्यांनी मला फोन केला. दिल्लीमध्ये आहे, पुढील महिनाभरात मोठी राजकीय उलाढाल होतेय. त्यामुळे मला माफ करा, मी या कार्यक्रमाला येऊ शकत नाही तेव्हा मी म्हटलं, सरकार पाडा आणि या, महाराष्ट्रात स्वागत करतो असं विधान त्यांनी भाषणात केले.
दिल्लीत नेमकं काय घडतंय?
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाला २४० जागांवर समाधान मानावं लागलं. अबकी बार ४०० पार असा नारा देणाऱ्या भाजपाला विरोधकांच्या इंडिया आघाडीने चांगलाच दणका दिला. त्यामुळे गेली १० वर्ष स्वबळावर बहुमताच्या जागा जिंकणाऱ्या भाजपाला यंदा मित्रपक्षांच्या आधारावर तिसऱ्यांदा देशात सरकार बनवावं लागले. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पाठिंब्यावर देशात भाजपाने सरकार बनवलं. त्यामुळे अर्थसंकल्पातही आंध्र प्रदेश आणि बिहार यांना मोठ्या प्रमाणात निधी देत भाजपाने खुश करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातं. त्यातच बिहारला विशेष राज्याचा दर्जा न दिल्याने नितीश कुमार यांच्या नाराजीच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. एका काँग्रेस आमदाराने लवकरच नितीश कुमार इंडिया आघाडीसोबत येतील असा दावा केला आहे.
दुसरीकडे एनडीएतील घटक असलेल्या जेडीएसनंही भाजपापासून काही अंतर ठेवले आहे. कर्नाटकात एनडीएकडून येत्या ३ ऑगस्टपासून तिथल्या सिद्धरमैय्या सरकारविरोधात पदयात्रा काढण्यात येणार आहे. मात्र भाजपाच्या या पदयात्रेत आमचा पक्ष सहभागी होणार नाही अशी घोषणा जेडीएस प्रमुख कुमारस्वामी यांनी केली आहे. जेडीएसच्या या पवित्र्यामुळे ते भाजपासोबत नाराज आहेत का अशी चर्चा सुरू झाली. त्यातच आता दिल्लीत मोठ्या उलाढाली सुरू आहे असं शरद पवारांनी विधान केल्याचं शेकाप नेते जयंत पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात पुढील १ महिन्यात काही महत्त्वाची घडामोड घडणार का हे पाहणं गरजेचे आहे.