राजकारणी, सेलीब्रिटींनी थकवले पोलिसांचे ५.२१ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 04:24 AM2017-12-04T04:24:19+5:302017-12-04T04:24:36+5:30
सदैव सशस्त्र पोलीस संरक्षणात मिरविणाºया मुंबईतील ३२ जणांनी मुंबई पोलिसांचे तब्बल ५ कोटी २१ लाख रुपये थकविल्याची माहिती पुढे आली आहे.
जमीर काझी
मुंबई : सदैव सशस्त्र पोलीस संरक्षणात मिरविणाºया मुंबईतील ३२ जणांनी मुंबई पोलिसांचे तब्बल ५ कोटी २१ लाख रुपये थकविल्याची माहिती पुढे आली आहे. शहर व उपनगरातील विविध राजकारणी, उद्योगपती, बिल्डर व सेलीब्रिटींचा त्यात समावेश असून त्यांना पुरविल्या जाणाºया बंदोबस्ताचे शुल्क कित्येक महिने, वर्षांपासून भरण्याची तसदी या व्यक्तींनी घेतलेली नाही. या थकबाकीदारांकडून वसुलीसाठी ठोस कार्यवाही न करता केवळ पत्रव्यवहार करण्याव्यतिरिक्त पोलीस प्रशासनाने फारशी हालचाल केली नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.
राजकारणी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, कलाकारांच्या जिवाला धोका असल्यास त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव सशुल्क पोलीस बंदोबस्त पुरविला जातो. मात्र बहुतांश वेळा संबंधितांकडून या सुविधेचा गैरवापर होतो. प्रभाव पाडण्यासाठी अंगरक्षक वापरले जात असल्याचे अनेक वेळा स्पष्ट झाले आहे. त्याबाबत उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवर न्यायालयाने नुकतेच राज्य सरकारला खडसावले आहे. त्या अनुषंगाने मुंबई पोलीस दलाकडून संरक्षण पुरविण्यात येणाºयांची नावे, थकबाकी व वसुलीबाबत ‘आरटीआय’अंतर्गत विचारणा केली. त्याबाबत संरक्षण शाखेचे साहाय्यक आयुक्त व जनमाहिती अधिकारी राजाराम प्रभू यांनी माहिती दिली. सध्या मुंबई शहरातील शहर व उपनगरातील एकूण १३३ खासगी व्यक्तींना बंदोबस्त पुरविण्यात येत आहे. त्यात राजकारणी, उद्योगपती, बिल्डर, कलाकार आदींचा समावेश आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची नावे देण्यास नकार दिला आहे. यापैकी ३२ जणांकडे ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत तब्बल ५ कोटी २१ लाख २२ हजार ३२८ रुपये थकबाकी आहे. बंदोबस्ताचे शुल्क न भरणाºयांमध्ये काही राजकीय नेते, उद्योगपती, बिल्डर व कलाकारांचाही समावेश असल्याचे माहितीत नमूद केले आहे. वसुलीसाठी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. मात्र त्यासाठी शहर व उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पत्रव्यवहार केल्याचे पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.
बारा तासांवरून आठ तास
सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्यांसाठी ३० जून २०१५ पर्यंत बारा तासांची ड्यूटी समजून आकारणी केली जात होती. मात्र एक जुलै २०१५ पासून आठ तासांची ड्यूटी व त्याहून अधिक काळासाठी अतिरिक्त दराचे शुल्क घेण्यात आले आहे.
यांना मिळते मोफत संरक्षण
संरक्षण शाखेच्या युनिट-२ कडून १७ कॅबिनेट मंत्री, १३ राज्यमंत्री, एक विरोधी पक्षनेते, विधान परिषदेचे सभापती, गृहसचिव यांना मोफत अंगरक्षक पुरविले जातात. त्यासाठी कसलेही शुल्क घेण्यात येत नसल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले.