सभापतींविरोधात सत्ताधाऱ्यांचे ‘तक्रारास्त्र’
By Admin | Published: December 23, 2015 11:37 PM2015-12-23T23:37:59+5:302015-12-23T23:37:59+5:30
विधानपरिषदेच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रगीताविना सभागृह संस्थगित करण्याचा प्रकार घडला. यामुळे झालेल्या ‘न भुतो न भविष्यति’
योगेश पांडे, नागपूर
विधानपरिषदेच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रगीताविना सभागृह संस्थगित करण्याचा प्रकार घडला. यामुळे झालेल्या ‘न भुतो न भविष्यति’ गोंधळामुळे विधानपरिषदेच्या इतिहासात प्रथमच एकदा संस्थगित झालेले सभागृह परत सुरू झाले. या प्रकाराबाबत सत्ताधाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. सभापतींकडून संपूर्ण अधिवेशनात आमच्यावर अन्याय करण्यात आला असा आरोप करत त्यांच्याविरुद्ध राज्यपालांकडे तक्रार करण्यात येईल, असे खुद्द मुख्यमंत्र्यांनीदेखील स्पष्ट केले. वेळ पडली तर पुढे अविश्वास प्रस्तावदेखील आणण्याबाबत विचार करू असा इशारा देण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी विधानपरिषदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर नियम २६० अंतर्गत झालेल्या चर्चेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उभे झाले. परंतु विरोधकांनी सभागृहात गोंधळ सुरू केला. मुख्यमंत्री बोलत असतानाच तालिका सभापतींनी कामकाज स्थगित केले. यावरून सत्ताधारी बाकांवरील सदस्य संतप्त झाले. हे सभागृहाच्या नियमाविरुद्ध असल्याची भूमिका त्यांनी मांडली. यानंतर सभागृहात सातत्याने गोंधळ सुरूच होता व दुपारपर्यंत सभागृहाचे कामकाज चक्क सातवेळा स्थगित करण्यात आले.
दुपारी परत कामकाज सुरू झाल्यानंतर सभापती रामराजे निंबाळकर नाईक यांनी गोंधळातच कामकाज सुरू केले. सभागृहाचे नेते एकनाथ खडसे हे उत्तर देत असतानाच परत सभापतींनी त्यांना थांबविले व निवेदन पटलावर ठेवण्याची सूचना केली. यावर सत्ताधारी आक्रमक झाले असतानाच राष्ट्रगीताचा पुकारा न करताच त्यांनी सभागृहाचे कामकाज ९ मार्चपर्यंत संस्थगित केल्याची घोषणा केली व ते सभागृहाबाहेर निघून गेले.
यासंदर्भात सत्ताधारी पक्षांकडून सभापतींच्या दालनासमोर गोंधळ करण्यात आला. यानंतर सभागृह परत सुरू झाले. मी नियमानुसार सभागृह संस्थगित केले नाही, तर गोंधळ शांत करण्यासाठी केले. ९ मार्चची तारीख चुकून माझ्या तोंडून निघून गेली, असे सभापतींनी प्रतिपादन केले. यानंतर परत गोंधळ सुरू झाला. अखेर सभापतींनी राष्ट्रगीताचा पुकारा केला व सभागृहाची बैठक पुढील अधिवेशनापर्यंत संस्थगित केली. अशाप्रकारे एकाच सभागृहाची बैठक एकाच दिवसात दोन वेळा संस्थगित करण्यात आली.
सभापती कक्षासमोर ‘संतापनाट्य’
राष्ट्रगीताचा पुकार न करताच सभागृहाचे कामकाज संस्थगित केल्यामुळे सत्ताधारी प्रचंड संतप्त झाले. सभापतींच्या कक्षाबाहेरच मंत्री व सदस्यांनी राष्ट्रगीत म्हणण्याची तयारी सुरू केली. यात महसूलमंत्री एकनाथ खडसे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते हे आघाडीवर होते. जर असे झाले तर यामुळे आणखी गोंधळ होऊ शकतो ही बाब लक्षात आल्यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व सुनील तटकरे यांनी सर्व सत्ताधाऱ्यांना आत चलण्याची विनंती केली. परंतु सभागृह संस्थगित झाल्यानंतर आता परत कसे जाणार असा प्रश्न तावडे यांनी उपस्थित केला. अखेर सर्व जण सभापतींच्या दालनात गेले.
बेकायदेशीर कामकाज
सभापतींनी सभागृहात नियमांचे पालन केलेल नाही. मुख्यमंत्री आले नसताना सभापतींनी राष्ट्रगीत न घेता सभागृहाची बैठक संस्थगित करणे योग्य नाही. विरोधकांपुढे झुकून त्यांनी हे केले. परंतु सभागृह व नियमांसमोर कोणीही मोठे नाही.
-गिरीश बापट, संसदीय कार्यमंत्री
सभापतींविरोधात अविश्वास प्रस्तावाचा विचार
सभापतींनी सभागृहाच्या प्रथा-परंपरा नियम पाळलेले नाहीत. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर अन्याय केला आहे. एकदा संस्थगित केलेले कामकाज त्याच दिवशी सुरू करता येत नाही. जर कामकाज सुरू करायचे असेल तर राज्यपालांची परवानगी घ्यावी लागते. त्यांची राज्यपालांकडे तक्रार करणार आहोतच. परंतु वेळ पडली तर अविश्वास प्रस्तावदेखील आणू. -एकनाथ खडसे, महसूल मंत्री