जेटीवरून राजकारण पेटले
By admin | Published: January 6, 2015 01:17 AM2015-01-06T01:17:23+5:302015-01-06T01:20:57+5:30
राजन तेलींना नमविण्याचा प्रयत्न : आरोंदा येथे तणावग्रस्त परिस्थिती
सावंतवाडी/आरोंदा : आरोंदा बंदर जेटीवरून सुरू झालेल्या राजकारणाची परिणती सोमवारी दगडफेकीत झाली. यामुळे आरोंद्यातील वातावरण तंग बनले आहे. नारायण राणेंच्या गोटातून भाजपात प्रवेश केल्याने आरोंदा जेटीला विरोध करत राजन तेलींना नामोहरम करण्याचा कॉँग्रेसचा प्रयत्न आहे.
कॉँग्रेसन नेते नारायण राणे यांनी दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीतील जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, उपाध्यक्ष रणजीत देसाई, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतिश सावंत, सावंतवाडी काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, सभापती गुरुनाथ पेडणेकर, अंकुश जाधव, माजी सभापती प्रकाश कवठणकर, जिल्हा परिषद सदस्य पुनाजी राऊळ, सभापती प्रमोद सावंत आदी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आरोंदा बंदर परिसरात दाखल झाले. त्यानंतर ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली. 'राजन तेली चोर आहे, त्याला गावातून हद्दपार करा', अशा घोषणा देत ग्रामस्थांनी स्थायी समितीबरोबर बंदराकडे मार्गक्रमण केले.
बंदराच्या आत प्रवेश करताना कंपनीने घातलेल्या संरक्षक भिंतीच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकाशी झटापट करीत प्रवेशद्वार तोडून आत प्रवेश केला. यावेळी महिला कमालीच्या आक्रमक झाल्या होत्या. बंदराच्या आतमध्ये घालण्यात आलेली संरक्षक भिंत ग्रामस्थांनी तोडून टाकली.
त्यांनी मेरीटाईम बोर्डाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी जमावाची समजून करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मेरीटाईम बोर्डाच्या कार्यालयात जात अधिकाऱ्यांना जाब विचारला. तुम्ही रस्ता अडविण्यास परवानगी कशी दिली, तुम्ही जर परवानगी दिली नसेल, तर आत्ताच्या आत्ता पोलिसात तक्रार द्या, अशी मागणी केली. बोर्डाचे अधिकारी प्रदीप आगाशे यांनी त्यास असमर्थता व्यक्त केली. आम्ही स्थायी समिती म्हणून आलो असताना हा आमचा अपमान आहे, तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले पाहिजे होते, असे सांगत लिहून देत नाही, तोपर्यंत हलणार नसल्याचा इशारा दिला. स्थायी समितीच्या पाहणीवेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर, विद्याधर नाईक, सुधाकर नाईक, प्रशांत नाईक, मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष गोकुळदास मोटे, मनोहर आरोंदेकर, दिलीप नाईक, गजानन तानावडे, बी. डी. पेडणेकर, शशी पेडणेकर, सरपंच आत्माराम आचरेकर, उपसरपंच वसंत चोडणकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
महेंद्र शेलार-सतीश सावंत यांच्यात खडाजंगी
मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्याने रस्ता अडवून देण्याबाबत संभ्रम निर्माण केल्यानंतर सतीश सावंत आक्रमक झाले. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांना दबावाने अधिकाऱ्यांकडून लिहून घेऊ नका, असे सांगितले. आम्ही दबावाने घेतो, हे तुम्ही सांगणारे कोण? असे विचारताच सतीश सावंत व महेंद्र शेलार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
राजन तेली कंपनी कार्यालयात थांबून
व्हाईट आॅर्चिड कंपनीचे संचालक माजी आमदार राजन तेली हे सोमवारी दुपारपासूनच स्थायी समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कंपनी कार्यालयात बसून होते. त्यांच्यासोबत काका कुडाळकर, राजन आरोंदेकर, मनोज नाईक, उमेश कोरगावकर आदी उपस्थित होते.