दलित तरुणाच्या आत्महत्येचे काँग्रेसकडून राजकारण
By admin | Published: February 1, 2016 02:56 AM2016-02-01T02:56:15+5:302016-02-01T02:56:15+5:30
काँग्रेसला दलितांविषयी अजिबात कळवळा नाही. त्यांनी इतकी वर्षे मते मिळविण्यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर केला.
औरंगाबाद : काँग्रेसला दलितांविषयी अजिबात कळवळा नाही. त्यांनी इतकी वर्षे मते मिळविण्यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर केला. आताही हैदराबादेत दलित तरुणाच्या आत्महत्येचे त्यांच्याकडून राजकारण केले जात आहे, असा आरोप केंद्रीय ग्राहक संरक्षण व अन्न पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी रविवारी केला.
रामविलास पासवान यांच्या प्रमुख उपस्थितीत मुकुंदवाडी, रामनगर येथे भारत विकास कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसाराचा शुभारंभ झाला. अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे होते. व्यासपीठावर लोकजनशक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष शमीम हवा व अन्य मान्यवर उपस्थित होते. भारत विकास कार्यक्रमांतर्गत केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने १९ महिन्यांत केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
पासवान म्हणाले, दलित समाज आजही मागास आहे; परंतु आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू केले आहे. दलित समाज आणि बाबासाहेब आंबेडकरांविषयी त्यांना आस्था आहे. ती काँग्रेसला नव्हती. हैदराबादेत दलित तरुणाने आत्महत्या केली म्हणून राहुल गांधी उपोषण करताहेत; पण त्या तरुणाने केलेली आत्महत्या आजही देशात जातीवाद जिवंत असल्याचे दर्शक आहे. इतकी वर्ष काँग्रेसने काय केले? सरकार असताना हैदराबादमध्येच सहा दलित तरुणांनी जातीवादातूनच आत्महत्या केल्या. तेव्हा ते कुठे होते, असा सवालही पासवान यांनी केला. (प्रतिनिधी)