राजकारण, मतभेद बाजुला पडले! शिंदे गटाचे किशोर पाटील बहीण वैशाली सूर्यवंशींच्या घरी गेले, भाऊबीज साजरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 11:56 AM2022-10-26T11:56:05+5:302022-10-26T11:57:06+5:30
भाऊ-बहिणीच्या प्रेमाच्या नात्यापुढं गळून पडले राजकीय मतभेद
- प्रशांत भदाणे
जळगाव : शिंदे गटाचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटलांनी ठाकरे गटात असलेल्या बहीण वैशाली सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन भाऊबीजेचा सण साजरा केला. आपला लाडका भाऊ भाऊबीजेला घरी आल्याने वैशाली सूर्यवंशी यांनी देखील राजकीय मतभेद बाजूला ठेवले, त्यांनी भाऊरायाचं मनोभावे औक्षण केले. आमदार किशोर पाटील आणि वैशाली सुर्यवंशी यांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या.
आम्ही लहानपणापासून दिवाळी आणि भाऊबीजेचा सण आनंदात साजरा करतो. आज आमच्या राजकीय वाटा वेगळ्या असल्या तरी भाऊ-बहीण म्हणून नातेसंबंध कायम आहेत. आमच्या नातेसंबंधात तोच गोडवा आहे, होता आणि यापुढे कायम राहणार, अशी प्रतिक्रिया आमदार किशोर पाटील यांनी दिली.
तर वैशाली सूर्यवंशी यांनी देखील, आमच्यात राजकीय मतभेद असले तरी नातेसंबंधातील गोडवा मात्र कायम असल्याचं सांगितले. शिंदे यांच्या बंडानंतर पाटील शिंदे गटात गेले तर सूर्यवंशी या ठाकरे गटातच राहिल्या. यानंतर या दोघ्यांच्यात राजकीय खटके उडत होते. याची राज्यभरात चर्चा सुरु होती.