पेंग्विनवरून राजकारण तापले

By admin | Published: October 25, 2016 04:42 AM2016-10-25T04:42:46+5:302016-10-25T04:42:46+5:30

बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या पेंग्विन या परदेशी पाहुण्यांना मुंबईत आणणे शिवसेनेला चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. तीन महिन्यांपूर्वीच भायखळा येथील राणीच्या बागेत

Politics erupted from the Penguin | पेंग्विनवरून राजकारण तापले

पेंग्विनवरून राजकारण तापले

Next

मुंबई : बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या पेंग्विन या परदेशी पाहुण्यांना मुंबईत आणणे शिवसेनेला चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. तीन महिन्यांपूर्वीच भायखळा येथील राणीच्या बागेत आलेल्या आठपैकी एका पेंग्विनचा रविवारी मृत्यू झाल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. ‘बालहट्टा’पायी राजरोस झालेली ही हत्याच असल्याने महापालिकेविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण केले जात आहे. या प्राणिसंग्रहालयात पेंग्विन आणण्याचा निर्धार शिवसेनेने २०१२ च्या निवडणुकीपूर्वी केला होता. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्वत: यात रस घेऊन परदेश दौरा करुन पेंग्विनची माहिती काढली होती. त्यानुसार तीन महिन्यांपूर्वी अडीच कोटी रुपये खर्च करुन हेमबोल्ट जातीचे आठ पेंग्विन आणले. त्यांच्यासाठी खास व्यवस्थाही प्राणिसंग्रहालयात करण्यात आली. परंतु यापैकी एका पेंग्विनचा रविवारी मृत्यू झाला.
आतड्यांचा संसर्ग आणि यकृत निकामी झाल्यामुळे या पेंग्विनचा मृत्यू झाल्याचा अहवाल शवविच्छेदनानंतर समोर आला. यामुळे महापालिकेला टीकेचे धनी बनावे लागले असून प्राणिमित्र संघटनांबरोबरच राजकीय पक्षांनीही प्रशासन व सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे. काँग्रेसने या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत ‘बालहट्टा’पायी ही हत्या झाल्याचा आरोप केला आहे. एवढेच नव्हे तर प्रिव्हिन्शेन आॅफ क्रुएल्टी अगेन्स्ट अनिमल्स अ‍ॅक्ट १९६० अंतर्गत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही सचिन सावंत यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

‘त्या’ जागेच्या पाहणीची केली मागणी
पेंग्विनच्या मृत्यूची गंभीर दखल घेत प्राणिमित्र संघटनांनीही सेंट्रल झू आॅथोरिटीकडे तक्रार केली आहे. उर्वरित सात पेग्विंनला ठेवण्यात आलेल्या प्राणी संग्रहालयात जागेची पाहणी करावी, अशी विनंती प्लॅन्ट अ‍ॅण्ड अनिमल्स वेल्फेअर सोसायटी मुंबई या बिगर शासकीय संस्थेने केली आहे. प्राण्यांची देखभाल चांगली ठेवण्यात येत नसल्यास प्राणिसंग्रहालयाचा परवाना रद्द करण्याची मागणीही संघटनेने केली आहे.
पेंग्विनचे आयुर्मान २० ते २५ वर्षे असते़ मात्र दीड वर्षांची डोरा ही मादी रविवारी आतड्यांच्या संसर्गाने मृत्युमुखी पडली. त्यांना देण्यात येणारे खाद्यपदार्थ त्यांना पचत नसावे, असा अंदाज बांधण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये प्राणिसंग्रहालयातील १४० प्राणी व पक्षी मृत्युमुखी पडले आहेत.

दक्षिण कोरिया येथील सेऊल महानगरातील कोएक्स मत्स्यालयातून आठ तासांचा विमान प्रवास करुन हम्बोल्ट प्रजातीचे आठ पेंग्विनचे भायखळा २६ जुलै २०१६ रोजी मुंबईत दाखल झाले.
त्यांच्यासाठी प्राणीसंग्रहालयाच्या नवीन इमारतीमध्ये तळ मजल्यावर सुमारे १७०० चौफ़ूट क्षेत्रफळाचे संपूर्णपणे वातानुकूलित पेंग्विन प्रदर्शन कक्ष तयार करण्यात आला आहे़ त्याचे तापमान १६ ते १८ डिग्री अंश सेल्सिअस इतके नियंत्रित करण्यात आले आहे़
दोन कोटी ५७ लाख रुपये खर्च करुन हे पेंग्विन खरेदी करण्यात आले आहेत. या पेंग्विनच्या जीवशास्त्रीय गरजा ध्यानात ठेवून हे पक्षीगृह तयार करण्यात येत आहे. आॅस्ट्रेलियातील आॅशियानीस या कंपनीला पाच वर्षांसाठी पेंग्विनच्या देखरेखीचे कंत्राट देण्यात आले आहे़ यासाठी पालिका २० कोटी रुपये खर्च करणार आहे़

Web Title: Politics erupted from the Penguin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.