फ्लेक्सबंदीवरून ‘राजकारण’ तापले
By Admin | Published: July 21, 2016 01:13 AM2016-07-21T01:13:30+5:302016-07-21T01:13:30+5:30
शहरातील मुख्य चौकांमधील विद्रूपीकरण थांबविण्यासाठी नगरपालिकेने शहरात फ्लेक्सबंदीचा निर्णय घेतला आहे.
बारामती : शहरातील मुख्य चौकांमधील विद्रूपीकरण थांबविण्यासाठी नगरपालिकेने शहरात फ्लेक्सबंदीचा निर्णय घेतला आहे. बंदीचा आदेश झुगारून लावल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी दिली. त्याची अंमलबजावणी आजपासूनच करण्यात आली आहे. या निर्णयाचे शहरातील प्रतिष्ठितांनी स्वागत केले आहे. मात्र, राजकीय कार्यकर्त्यांना हा निर्णय रुचलेला नाही. सत्तांतर झाल्यामुळे अन्य राजकीय नेत्यांचे फ्लेक्स बोर्ड लागत असल्याने हा चुकीचा निर्णय घेतला असल्याची टीका विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
यापूर्वी फ्लेक्स बोर्डचे स्तोम बंद करण्यासाठी प्रतिदिन शुल्क आकारणी करून बोर्ड लावले जात. आता काही मंडळी नगरपालिकेची परवानगी न घेता बोर्ड लावतात. त्यामुळे वाद होतो. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्याचा त्रास होतो. या पार्श्वभूमीवर फ्लेक्स बोर्ड लावण्यावरच बंदी घालण्यात आली आहे. फ्लेक्स बोर्ड लावल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नगराध्यक्ष जगताप यांनी सांगितले.
या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे. मात्र, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना हा निर्णय रुचलेला नाही. निर्णय जाहीर करण्यापूर्वी सर्व पक्षंच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची आवश्यकता होती, असे विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. फ्लेक्स बंदीबाबत मंडप असोसिएशन, फ्लेक्स बोर्ड प्रिंटिंग असोसिएशनबरोबर चर्चा केली असल्याचे नगराध्यक्ष जगताप यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
>फ्लेक्स संस्कृती नगराध्यक्षांची
सध्या बारामती नगरपालिकेचे नगराध्यक्ष असलेले योगेश जगताप यांनीच फ्लेक्स संस्कृती सुरू केली. त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्दच फ्लेक्स बोर्डच्या माध्यमातून केली. आता तेच बंदीसाठी आग्रही आहेत. शहराचे विदू्रपीकरण होऊ नये, यासाठी फ्लेक्सबंदी न करता, ठराविक जागा निश्चित करून फ्लेक्स बोर्ड लावण्यास परवानगी द्यावी. त्यासाठी पूर्वीप्रमाणे शुल्क आकारणी करावी, बोर्ड लावण्याचा कालावधी निश्चित असावा. संपूर्ण बंदीला आमचा विरोध आहे, असे राष्ट्रीय समाज पक्षाचे संदीप चोपडे यांनी सांगितले.