शहरातील प्रभागांची नावे लपविण्यामागे राजकारण
By admin | Published: October 8, 2016 12:59 AM2016-10-08T00:59:37+5:302016-10-08T00:59:37+5:30
पुण्यात महापालिकेची प्रभागरचना नावानुसार केली आहे. मात्र, पिंपरी-महापालिकेच्या निवडणुकीची प्रभागरचना करताना क्रमांक दिले
पिंपरी : पुण्यात महापालिकेची प्रभागरचना नावानुसार केली आहे. मात्र, पिंपरी-महापालिकेच्या निवडणुकीची प्रभागरचना करताना क्रमांक दिले आहेत. उद्योगनगरीत प्रभागांना नावे देण्यात राजकारण झाल्याची टीका विविध राजकीय पक्षांकडून होत आहे.
महापालिका निवडणुकीत प्रभाग मोठे झाले आहेत. नवीन प्रभाग करताना विविध भागांचा समावेश करावा लागला आहे. त्यामुळे प्रभागाचे नाव देताना प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे. मात्र, यातून पळ काढण्याचा प्रयत्न प्रशासकीय यंत्रणेने केला आहे. पुणे महापालिकेने प्रभागांना नावे दिली आहेत. बाणेर बालेवाडी पाषाण, वडगावशेरी कल्याणीनगर अशी नावे देऊन त्यांनी मार्ग काढला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रभागरचना करताना केवळ क्रमांक दिले आहेत. यामागे काय राजकारण आहे त्याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी शिवसेनेचे माजी शहर संघटक नंदकुमार सातुर्डेकर यांनी केला आहे .