राजकारणात मी अनेकांना नाड्या बांधायला शिकवले!
By admin | Published: May 20, 2017 12:47 AM2017-05-20T00:47:47+5:302017-05-20T00:47:47+5:30
राजकारणात आपण अनेकांना नाड्या बांधायला शिकविले. तेच आज बोलत आहेत. आपणास कर्तृत्व सांगायची गरज नाही, असा पलटवार बुधवारी माजी मंत्री एकनाथ खडसे
- लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राजकारणात आपण अनेकांना नाड्या बांधायला शिकविले. तेच आज बोलत आहेत. आपणास कर्तृत्व सांगायची गरज नाही, असा पलटवार बुधवारी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर केला. जिल्ह्यातील राजकारणामधील वर्चस्वावरून सध्या खडसे-महाजन यांच्यात वाद पेटला आहे.
भाजपाच्या महानगर विभागाच्या विस्तारक वर्गात गुरुवारी गिरीश महाजन यांनी कुणाचेही नाव न घेता ‘सगळे माझ्यामुळेच झाले असे म्हणण्याचे दिवस गेले’, अशा कानपिचक्या दिल्या होत्या. साहजिकच त्यांचा रोख खडसे यांच्याकडे होता.
शुक्रवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर संबंधित वक्तव्याचा कुणाचेही नाव न घेता खडसे यांनी समाचार घेतला.
ते म्हणाले, कर्तृत्ववान माणसाला त्याचे कर्तृत्व सांगण्याची गरज नसते. ज्याचे कर्तृत्व नाही त्याला प्रसिद्धी करून ते सांगावे लागते. मी काय आहे, काय केले हे शेंबडे पोरही सांगेल. राजकारणात अनेकांना नाड्या बांधायला मी शिकविल्या, तेच आज बोलत आहेत.
तापी पाटबंधारे महामंडळाचा निर्णय, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आयटीआय यासारखे अनेक जनहिताचे निर्णय मी घेतले. ते सर्वांना माहीत आहे. मला कर्तृत्व सांगण्याची गरज नाही, असाही टोला त्यांनी लगावला.