केजरीवालांचे राजकारण म्हणजे बुडबुडा, लवकर फुटेल - उद्धव ठाकरे

By admin | Published: December 23, 2015 09:14 AM2015-12-23T09:14:20+5:302015-12-23T10:36:25+5:30

डीडीसीए भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर आरोप करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडले.

The politics of Kejriwal's bubble, will break soon - Uddhav Thackeray | केजरीवालांचे राजकारण म्हणजे बुडबुडा, लवकर फुटेल - उद्धव ठाकरे

केजरीवालांचे राजकारण म्हणजे बुडबुडा, लवकर फुटेल - उद्धव ठाकरे

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - डीडीसीए भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर आरोप करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडले आहे. केजरीवाल यांचे राजकारण म्हणजे एक बुडबुडा आहे. तो फुटायला वेळ लागणार नाही! अशी टीका 'सामना'च्या अग्रलेखातून करतानाच त्यांनी जेटली यांची पाठराखण तेली आहे. 
दिल्लीतील अरुण जेटली विरुद्ध अरविंद केजरीवाल असा राजकीय सामना हा अनेकांसाठी बिनपैशांचा तमाशा झाला आहे असे सांगत वाट्टेल ते आरोप करण्यात केजरीवाल यांचा हात कोणीही धरू शकत नाही, असा घणाघात उद्धव यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात सीबीआयचे अधिकारी घुसले व त्यांनी वरिष्ठ अधिकारी राजेंद्र कुमार यांची चौकशी केली. या सर्व प्रकरणाचा केजरीवाल यांच्याशी थेट संबंध नव्हता तरीही केजरीवाल यांनी हे सर्व प्रकरण अंगावर ओढवून घेतले व त्याचा संबंध अर्थमंत्री जेटली यांच्याशी जोडून थयथयाट केला. आमच्याविरुद्ध बदनामीचा खटला दाखल करून अरुण जेटली आम्हाला घाबरविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही केजरीवाल म्हणाले होते. ते शूर आहेत, कोणाला घाबरत नाहीत, मग जेटली यांनी आम्हाला घाबरवू नये असे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगण्याचीही त्यांना गरज नाही, अशी टीका लेखात केली आहे.
केजरीवाल यांनी जेटलीप्रमाणेच पूर्वी गडकरींवरही आरोप केले होते, पण ते फुसके निघाले. गडकरींनीही केजरीवाल यांच्यावर मानहानीचा दावा ठोकलाच होता व शेवटी हे प्रकरण तडजोडीने मिटविले होते.  मात्र त्यामुळे गडकरींना भाजपाध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळाली नाही आणि त्याचे राजकीय नुकसान झाले. 
जेटली, गडकरी, यांच्याप्रमाणे गेल्या अधिवेशनात भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांना टार्गेट करण्यात आले असे सांगत मोदी सरकारची कबर नक्की कोण खोदत आहे, असा सवाल विचारण्यात आला आहे. मोदी सरकार खिळखिळे करण्याचा हा डाव आहे व सरकारचा एक एक खांब कमजोर करून ते डळमळीत करण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत, असा आरोपही लेखात करण्यात आला आहे. 

Web Title: The politics of Kejriwal's bubble, will break soon - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.