सुडाचे राजकारण महाराष्ट्राची संस्कृती नाही; खासदार सुप्रिया सुळे यांची ईडी कारवाईवर प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 07:55 AM2022-03-24T07:55:21+5:302022-03-24T07:55:40+5:30
खासदार सुळे म्हणाल्या, विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या यंत्रणांच्या माध्यमातून केला जात आहे. आजकाल पेन ड्राइव्ह बॉम्बची नवी फॅशन महाराष्ट्रात आली आहे.
नवी दिल्ली : ईडी व सीबीआय या यंत्रणांकडून महाराष्ट्रातील नेत्यांवर होत असलेल्या कारवाया हा सुडाच्या राजकारणाचा भाग असून, महाराष्ट्राच्या राजकारणातील ही संस्कृती नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाइकांच्या प्रतिष्ठांनावर केंद्रीय तपास यंत्रणांनी धाडी टाकल्या आहेत. यावर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या यंत्रणांच्या माध्यमातून केला जात आहे. आजकाल पेन ड्राइव्ह बॉम्बची नवी फॅशन महाराष्ट्रात आली आहे. पहिले दोन पेन ड्राइव्ह बॉम्ब तर फुसके निघाले. इतरही तथाकथित पुराव्यांतून काहीही निष्पन्न होणार नाही. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा लाभला आहे.
महाविकास आघाडी ‘चोरांची’
महाविकास आघाडीतील नेत्यांची आघाडी म्हणजे ‘चोर चोर मौसेरे भाई’ आहेत, अशा शब्दांत अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडी ही नियमाने चालणारी संस्था आहे. कायदे हे सर्वांसाठी सारखे आहेत. पेन ड्राइव्हमध्ये पुरावे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. या आरोपांमध्ये काही तथ्य नसल्यास कुणाला घाबरण्याचे काहीही कारण नाही. सामान्य लोकांसाठी जे कायदे आहेत. तेच कायदे इतरांसाठी असल्याचे खासदार राणा म्हणाल्या.