राज यांना भोवले दुटप्पी राजकारण

By admin | Published: October 21, 2014 03:39 AM2014-10-21T03:39:14+5:302014-10-21T03:39:14+5:30

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायचा आणि विधानसभा निवडणुकीत मोदींवर टीकास्त्र सोडायचे, राज ठाकरे यांच्या या दुटप्पी राजकारणाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुरती धूळधाण झाली आहे.

Politics of Raj Bhawal Bhola | राज यांना भोवले दुटप्पी राजकारण

राज यांना भोवले दुटप्पी राजकारण

Next

मुंबई : लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायचा आणि विधानसभा निवडणुकीत मोदींवर टीकास्त्र सोडायचे, राज ठाकरे यांच्या या दुटप्पी राजकारणाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुरती धूळधाण झाली आहे. १३ आमदारांवरुन त्यांची संख्या एका आमदारावर आली.
२००९च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाची मते मिळवून १३ आमदार निवडून आणणाऱ्या राज यांची राजकीय वाटचाल दमदार असेल, असे भाकित वर्तविले होते, पण राज यांनी उलटसुलट भूमिका घेत त्यांनी स्वत:बरोबर पक्षालाही चक्रव्युहात टाकले. मोदींबाबतच्या उलटसुलट विधानांनी युवावर्ग त्यांच्यापासून दूर गेला. उच्च मध्यमवर्गीय मराठी माणूसही सध्या मोदींच्या प्रभावाखाली आहे. राज यांच्या ब्ल्यू प्रिंटचे या वर्गाला आकर्षण वाटेल, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु केंद्रात व राज्यात मोदी सरकार द्या हे पंतप्रधानांचे आवाहन अधिक प्रभावी ठरल्याने या वर्गाने मनसेच्या ब्ल्यू प्रिंटकडे पाठ फिरवली.
मुंबईतील किमान १० विधानसभा मतदारसंघात गुजराती, उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय मतदारांनी भाजपाला एकगठ्ठा मतदान केले आहे. मनसेने पक्ष स्थापनेच्या वेळी उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेऊन मारहाण केली होती. त्या वर्गाला मोदींचा पर्याय समोर दिसल्यावर त्यांनी मनसेच्या दबावाला झुगारून मतदान केले आहे. घाटकोपर (प.) व मुलुंड या दोन मतदारसंघात मराठी मतदारांचा टक्का हा अमराठी लोकांपेक्षा अधिक आहे. त्या मतदारसंघांतही भाजपाने विजय मिळवला याचा अर्थ मनसेने मराठी माणसांची घोर निराशा झाली आहे.
राज यांच्या भूमिकांत व वर्तनात सातत्य नसल्याने त्यांची विश्वासार्हता लयाला गेली आहे, असे जाणकारांचे मत आहे. राज यांनी पक्ष स्थापन केला तेव्हा विकासाची ब्ल्यू प्रिंट जाहीर करण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात ती बाहेर येण्यास नऊ वर्षे लागली. तोपर्यंत नाशिक महापालिकेत त्यांना सत्ता मिळाली, पण तेथेही त्यांनी प्रभावी काम करून दाखवता आले नाही. शिवसेना-भाजपा युती तुटण्याच्या मुहूर्तावर ब्ल्यू प्रिंटचे प्रकाशन झाल्याने लोकांपर्यंत ती पोहोचली नाही. लोकसभा निवडणुकीत भुजबळ यांच्याबाबतही टोकाची भाषा राज यांनी केली होती. नाशिकमध्ये भाजपाने पाठिंबा काढल्यावर राज यांनी थेट त्याच भुजबळ यांच्याशी हातमिळवणी केली. राज अशा कोलांटउड्यांमुळे त्यांचा पक्ष गटांगळ्या खात राहिला. (प्रतिनिधी)

Web Title: Politics of Raj Bhawal Bhola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.