महायुतीत मनोमिलनाचे रंग, दूर गेलेले पुन्हा आले जवळ; महादेव जानकर महायुतीतच
By दीपक भातुसे | Published: March 25, 2024 06:01 AM2024-03-25T06:01:26+5:302024-03-25T06:50:46+5:30
जागा वाटपाबाबत महायुतीची बैठक सुरू असतानाच महादेव जानकर यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला.
मुंबई : राज्यभर होळी साजरी होत असताना रविवारी राज्याच्या राजधानीत महायुतीतील घडामोडींना वेग आला होता. जागा वाटपाबाबत महायुतीची बैठक सुरू असतानाच महादेव जानकर यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला. दुसरीकडे याचवेळी काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीला शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते. या बैठकीत जागा वाटपावर चर्चा करण्यात आली. मात्र रात्री उशीरापर्यंत प्रदीर्घ चाललेल्या या बैठकीनंतरही महायुतीचे जागा वाटप अद्याप अंतिम झाले नसल्याचे समजते.
राष्ट्रवादीने ७ जागांचा आग्रह कायम ठेवला असून शिंदे गटालाही १६ ते १७ जागा हव्या आहेत. एक-दोन दिवसांत तोडगा न निघाल्यास पहिल्या टप्प्यातील ७ जागांचे वाटप पूर्ण करून उर्वरित जागांची चर्चा नंतर करण्याबाबत ठरल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.
बच्चू कडू आक्रमक
आमदार बच्चू कडू यांचा नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध आहे. राणांना उमेदवारी दिल्यास आपण उमेदवार देऊ, असा इशारा त्यांनी दिला. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी कडू यांना मुंबईत बोलवले.
महादेव जानकरांना काेणता मतदारसंघ?
राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्या पक्षाला परभणीची जागा देण्याचे आश्वासन महायुतीने दिले आहे. यापूर्वी माढ्यातून निवडणूक लढवण्याची घोषणा जानकर यांनी केली होती, शरद पवार यांचीही भेट घेतली होती.
नाशिकसाठी शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन
नाशिक लोकसभा शिवसेनेचा बालेकिल्ला असून ही जागा महायुतीत शिवसेनेला मिळावी, या मागणीसाठी शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि नाशिकचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी वर्षा निवासस्थानाबाहेर शक्तिप्रदर्शन केले.
काँग्रेस आमदार पारवे शिंदे गटात
काँग्रेसचे उमरेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू पारवे यांनी रविवारी काँग्रेसचा राजीनामा देत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार तसेच रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जैस्वाल आणि शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव उपस्थित होते. पारवे यांना रामटेकमधून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
ज्योती मेटे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी रविवारी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. तेव्हा त्या पवार गटाच्या बीडमधील उमेदवार असतील अशी चर्चा होती.
हर्षवर्धन पाटील यांचीही नाराजी दूर करणार
बारामतीत भाजपचे हर्षवर्धन पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी त्यांच्याशी पुन्हा चर्चा केली. अजित पवार यांनीही हर्षवर्धन पाटील यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.
उदयनराजे ‘घड्याळा’वर लढणार?
उदयनराजे भोसले यांच्या साताऱ्यातील उमेदवारीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. अमित शाह यांच्या
भेटीनंतरही त्यांच्या उमेदवारीबाबत संदिग्धता आहे. उदयनराजे घड्याळावर लढायला तयार असतील आम्ही सातारची उमेदवारी त्यांना देऊ अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली.
अहमदनगर दक्षिणमधील वाद
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे राम शिंदे आणि सुजय विखे यांच्यात वाद आहे. हा वाद मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना मध्यस्थी करत रविवारी रात्री राधाकृष्ण विखे-पाटील, सुजय विखे पाटील व राम शिंदेंशी चर्चा केली.