विधानपरिषदेसाठी ३ फेब्रुवारीला मतदान
By admin | Published: January 5, 2017 04:25 AM2017-01-05T04:25:21+5:302017-01-05T04:25:21+5:30
महाराष्ट्र विधान परिषदेवर शिक्षक मतदारसंघांतून तीन व पदवीधर मतदारसंघांतून दोन सदस्य निवडून देण्यासाठी येत्या ३ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे.
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेवर शिक्षक मतदारसंघांतून तीन व पदवीधर मतदारसंघांतून दोन सदस्य निवडून देण्यासाठी येत्या ३ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे.
विक्रम वसंतराव काळे (औरंगाबाद, शिक्षक), नागो पुंडलिक गाणार (नागपूर, शिक्षक), रामनाथ दादा मोते (कोकण, शिक्षक), रणजीत विठ्ठलराव पाटील (अमरावती, पदवीधर) आणि सुधीर भास्कर तांबे (नाशिक, पदवीधर) हे सदस्य सहा वर्षांची मुदत संपून ५ डिसेंबर रोजी निवृत्त झाल्याने ही निवडणूक होत आहे. यापैकी भाजपाचे रणजित पाटील हे गृह राज्यमंत्री असल्याने मंत्रीपद टिकविण्यासाठी त्यांना पुन्हा निवडून येणे गरजेचे आहे. खरे तर ही व्दैवार्षिक निवडणूक विद्यमान सदस्यांची मुदत संपण्याआधीच व्हायला हवी होती. परंतु पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या मतदारयाद्या नव्याने तयार करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने त्या याआधी घेता आल्या नाहीत. सुधारित मतदारयाद्या तयार करण्याचे काम सुरु असून ७ जानेवारी रोजी अंतिम याद्या प्रसिद्ध झाल्यावर निवडणूक प्रक्रिया सुरु होईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. या निवडणुका विभागीय पातळीवर होणार असून त्या त्या विभागांमधील जिल्ह्यांमध्ये निवडणूक आचारसंहिता लगेच लागू झाल्याचेही आयोगाने स्पष्ट केले.
१० जानेवारी-अधिसूचना प्रसिद्धी
१७ जानेवारी- उमेदवारी अर्जांसाठी अंतिम मुदत
१८ जानेवारी-उमेदवारी अर्जांची छाननी
२० जानेवारी- अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत
३ फेब्रुवारी- मतदान (स. ८ ते सा. ४)
६ फेब्रुवारी-मतमोजणी व निकाल