ठाणे, रायगडसह राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींसाठी २७ मे रोजी मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 04:30 AM2018-04-24T04:30:34+5:302018-04-24T04:30:34+5:30
सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही त्यात समावेश आहे.
विशेष प्रतिनिधी ।
मुंबई : राज्यातील २५ जिल्ह्यांतील ६५४ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक आणि २ हजार ८१२ ग्रामपंचायतींतील ४,७७१ पोटनिवडणुकांसाठी २७ मे मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने ही घोषणा सोमवारी केली.
सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही त्यात समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ७ ते १२ मे दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. त्यांची छाननी १४ मे रोजी होईल. अर्ज १६ मे रोजी मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान २७ मे रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत होईल. मतमोजणी २८ मे रोजी होणार आहे.
सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी - ठाणे ५, पालघर ३, रायगड १८७ , सिंधुदुर्ग- २, नाशिक २० , धुळे ७, जळगाव ८, अहमदगनर ७७, पुणे ९०, सोलापूर ३, सातारा २३, सांगली ८२, कोल्हापूर ७४, औरंगाबाद ४, बीड २, नांदेड ७, परभणी १, उस्मानाबाद ३, लातूर ५, अकोला २, यवतमाळ २९, वर्धा १४, भंडारा ४ आणि गडचिरोली २.