नाशिकमध्ये उगवत्या दिनकराच्या साक्षीने मतदानाला सुरूवात; चोख बंदोबस्त
By admin | Published: February 21, 2017 09:18 AM2017-02-21T09:18:29+5:302017-02-21T09:18:29+5:30
शहरात सकाळी साडेसात वाजेपासूनच नागरिकांनी लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार व राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.
अझहर शेख /आॅनलाइन लोकमत / नाशिक : शहरात सकाळी साडेसात वाजेपासूनच नागरिकांनी लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार व राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. शहरासह उपनगरांमध्येही पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतरापर्यंत कोणताही बुथ, किंवा दुकाने लावण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. नाशिककर मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सर्वत्र नागरिक मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत उत्तम नाशिकसाठी महापालिके मध्ये नव्याने येत्या पाच वर्षांसाठी लोकप्रतिनिधींची निवड करताना दिसत आहे.
पंधरवड्यापासून शहरात महापालिका निवडणूकीचा रणसंग्राम सुरू झाला होता. प्रचारफेऱ्या, उमेदवारांच्या गाठीभेटी, नेत्यांच्या प्रचार सभा या सर्वांनी अवघे शहर जणू ढवळून निघाले होते. सर्वत्र ‘विजयी करा....विजयी करा...’ असाचा सूर कानी पडत होता; मात्र आदर्श आचारसंहितेनुसार रविवारी (दि.१९) संध्याकाळपासून प्रचाराचा हा सूर बंद पडला अन सारे शांत..शांत..झाले. मंगळवारी (दि.२१) मतदानाचा दिवस उजाडला आणि लोकशाहीने दिलेला हक्क बजावण्यासाठी नागरिक सकाळी साडेसात वाजेपासून घराबाहेर पडले. शहरात आठवडाभरापासून वाढते तपमान लक्षात घेता वृध्द, महिला तसेच युवतींनी देखील सकाळी कोवळ्या उन्हात ‘फ्रेश’मूडमध्ये मतदानाला जाणे पसंत केले. यामुळे मतदान केंद्रांवर गर्दी पहावयास मिळत होती. सर्वच मतदान केंद्रांभोवती चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतदान केंद्राबाहेर उमेदवारांचे नाव, शिक्षण, गुन्हेगारी पार्श्वभूमी झळकविण्यात आली आहे. विशेष म्हणजे मतदार ही माहिती वाचून केंद्रात प्रवेश करत आहेत. यामुळे यंदा नाशिक महापालिकेत सुशिक्षित, स्वच्छ लोकप्रतिनिधी निवडून जाण्याची आशा आहे.