पाच मतदारसंघातील मतदारयाद्या रद्द
By admin | Published: September 19, 2016 04:50 AM2016-09-19T04:50:51+5:302016-09-19T04:50:51+5:30
विधान परिषदांच्या पाच मतदारसंघातील मतदार याद्या रद्द करत नव्याने मतदार याद्या तयार करण्याचे आदेश शुक्रवारी जारी केले़
अण्णा नवथर,
अहमदनगर- केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदांच्या पाच मतदारसंघातील मतदार याद्या रद्द करत नव्याने मतदार याद्या तयार करण्याचे आदेश शुक्रवारी जारी केले़ त्यामुळे नाशिक, अमरावती पदवीधर, औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका वेळेवर होण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
विधान परिषदेचे सदस्य नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ़ सुधीर तांबे, अमरावतीचे आ़ रणजित पाटील, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे आ़ विक्रम काळे, नागपूर शिक्षक मतदारसंघाचे आ़ नागो गणार, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आ़ रामनाथ मोते यांची मुदत ५ डिसेंबरला संपत आहे़ त्यापूर्वी वरील पाच जागांसाठी निवडणुका होतील, असे गृहीत धरून प्रशासनाने मतदार याद्या अद्ययावत करण्याची मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली होती़
मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने नाशिक, अमरावती (पदवीधर मतदारसंघ), औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागातील (शिक्षक मतदारसंघ) मतदार याद्या रद्द केल्या आहेत़
१ आॅक्टोबरपासून नव्याने मतदार याद्या तयार करण्याचे आदेश दिले आहेत़ तसा आदेश जिल्हा निवडणूक शाखेस शुक्रवारी प्राप्त झाला़ अंतिम मतदार याद्या ३० डिसेंबरला प्रसिद्ध होणार असून, त्यानंतरच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल, असे संकेत आहेत़
आयोगाचा हा निर्णय महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, आंध्र, बिहार, तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी लागू आहे़ मतदार यादीतील खोटे, स्थलांतरित, दुबार आणि मृत मतदारांचा शोध घेण्यासाठी आयोगाने २० कलमी कार्यक्रम जाहीर केला़ त्यानुसार नाशिक व अमरावती पदवीधर मतदारसंघातील अशा मतदारांची शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र गेल्या सहा महिन्यांत प्रशासन केवळ २८ टक्के मतदारांपर्यंतच पोहोचू शकले.
>नाशिक पदवीधरचे
३ लाख मतदार बाद
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ३ लाख २७ हजार मतदारांची यादी तयार करण्यात आली होती़ ही यादी रद्द करण्यात आली असून, त्यामध्ये नगर जिल्ह्यातील १ लाख १२ हजार मतदारांचा समावेश आहे़
>पदवीधर मतदारसंघातील मतदार याद्यांबाबत नुकतेच आदेश प्राप्त झाले आहेत़ यासंदर्भात नाशिक विभागीय आयुक्तांकडे सोमवारी बैठक आहे़ या बैठकीत याविषयी सूचना वरिष्ठांकडून दिल्या जातील़ त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल़
- अनिल कवडे,
जिल्हाधिकारी, अहमदनगर