बंडखोरी रोखण्यासाठी पुण्यातून उमेदवारी
By admin | Published: November 2, 2016 01:27 AM2016-11-02T01:27:24+5:302016-11-02T01:27:24+5:30
विधान परिषद निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवडमधून इच्छुकांची संख्या अधिक होती.
पिंपरी : विधान परिषद निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवडमधून इच्छुकांची संख्या अधिक होती. राष्ट्रवादीकडून कोणत्याही एका इच्छुकाला उमेदवारी दिली, तर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविली जात होती. ही बंडखोरी रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवडऐवजी विधान परिषदेची उमेदवारी पुन्हा पुण्यातील अनिल भोसले यांना जाहीर करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे शहरातील राष्ट्रवादीतील इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
पुणे विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राष्ट्रवादीतून इच्छुकांची संख्या वाढली होती. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी व गटबाजीचा फटका बसल्याने भोसरीचे आमदार विलास लांडे यांचा पराभव झाला होता. महापौर निवडीतही लांडे गटाला डावलले होते. त्यामुळे नाराज लांडे भाजपाच्या वाटेवर असल्याची दोन वर्षांपासून चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांची नाराजी दूर करण्याविषयी बोलले जात होते. शिवाय परिषदेवर पिंपरी-चिंचवडमधील कोणत्याही एका इच्छुकास संधी दिल्यास पक्षाची ताकद वाढले, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती.
दरम्यानच्या काळात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे लांडगेंच्या विरोधात लांडे यांना पक्षातून ताकद दिली जाईल, असा अदांज राजकीय वर्तुळातून होता. तसेच राष्ट्रवादीकडून माजी महापौर आझम पानसरे व योगेश बहल यांच्या नावाचीही चर्चा होती.शिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनाही राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी राजकीय समीकरणे मांडली जात होती. त्यामुळे विधान परिषदेसाठी लांडे, भोईर, पानसरे व बहल यांच्यापैकी कोणाची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता होती. त्यासाठी प्रत्येकाकडून पक्षाकडे मोर्चेबांधणी सुरू होती. यापैकी कोणा एकाला उमेदवारी दिली, तर दुसरा गट नाराज होण्याची शक्यता होती. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा अनिल भोसले यांची उमेदवारी आज जाहीर करण्यात आली. आता पिंपरी-चिंचवडला स्थान न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. (प्रतिनिधी)