तडजोड होणार की मतदान?

By admin | Published: March 11, 2015 01:54 AM2015-03-11T01:54:08+5:302015-03-11T01:54:08+5:30

विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावरून दोन्ही काँग्रेसमध्ये अद्याप

Polling that will be compromised? | तडजोड होणार की मतदान?

तडजोड होणार की मतदान?

Next

मुंबई : विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावरून दोन्ही काँग्रेसमध्ये अद्याप समेट झालेला नाही. उलट भाजपाच्या मदतीने हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते पडद्याआड व्यूहरचना करत असल्याची चर्चा आहे.
सभापती देशमुख यांच्यावर हिवाळी अधिवेशनात दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव मंगळवारच्या कामकाज पत्रिकेवर दाखवण्यात आला होता. त्यामुळे देशमुख यांनी सकाळपासून सभापतींच्या आसनावर बसण्याचे टाळले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत विरोधकांनी दाखल केलेला स्थगन प्रस्ताव स्वीकारण्यावरून सभागृहाचे कामकाज तीनवेळा तहकूब होऊन दिवसभराकरिता बंद झाल्याने हा अविश्वास प्रस्ताव मतासाठी टाकण्यात आलाच नाही. आता बुधवारी पुन्हा कामकाज पत्रिकेवर तो दाखवण्यात येईल.
याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, सभापतींविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे. संख्याबळाच्या आधारे सभापतीपद राष्ट्रवादीकडे असणे गरजेचे आहे. अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्याकरिता भाजपाची मदत घेण्याच्या शक्यतेसंबंधी विचारले असता तटकरे यांनी ही शक्यता फेटाळून लावली, पण ऐनवेळी बघू, असे मोघम उत्तर दिले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे मंगळवारी दिल्लीत गेले असून, तेथे ते पक्षश्रेष्ठींबरोबर अनेक विषयांवर चर्चा करणार आहेत. त्यामध्ये एक मुद्दा हा सभापतीपदाच्या वादाचा असल्याचे कळते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीने सभापतींविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव मागे घ्यावा, अशी विनंती काँग्रेसने केली आहे. मात्र हा प्रस्ताव मंजूर करवून घ्यायचा तर राष्ट्रवादीला भाजपाची मदत घेण्याखेरीज पर्याय नाही. राष्ट्रवादीने भाजपाची मदत घेतली तर दोन्ही सभागृहांतील विरोधकांच्या एकजुटीवर त्याचा निश्चित विपरीत परिणाम होईल. संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट म्हणाले की, सभापतींविरुद्धचा अविश्वास ठराव ज्या वेळी मतास टाकण्यात येईल त्या वेळी भाजपा आपली भूमिका निश्चित करील. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Polling that will be compromised?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.