पोलीसमित्रांची घेतली जाणार हजेरी
By admin | Published: March 27, 2016 01:24 AM2016-03-27T01:24:56+5:302016-03-27T01:24:56+5:30
राज्यात सर्वत्र ‘पोलीसमित्र’ ही संकल्पना राबवली गेल्याने पोलीस दलाच्या मदतीसाठी हजारो स्थानिक पोलीसमित्र म्हणून पुढे आले आहेत. त्यांनी घेतलेली जबाबदारी ते पार पाडतात की नाही
- पंकज रोडेकर, ठाणे
राज्यात सर्वत्र ‘पोलीसमित्र’ ही संकल्पना राबवली गेल्याने पोलीस दलाच्या मदतीसाठी हजारो स्थानिक पोलीसमित्र म्हणून पुढे आले आहेत. त्यांनी घेतलेली जबाबदारी ते पार पाडतात की नाही, यासाठी त्यांची हजेरी घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे वारंवार दांडी मारणाऱ्या पोलीसमित्रांच्या जागी नवीन पोलीसमित्र नेमण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पोलीसमित्र ही संकल्पना राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची आहे. पोलीस महासंचालकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी ती संकल्पना राज्यातील पोलीस दलांना राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत
सुमारे २०० पोलीसमित्र असावेत,
असे सांगण्यात आले. त्यानुसार,
शहर आणि ग्रामीण पोलीस
दलात अशा प्रकारे हजारो तरुण पोलीसमित्र होण्यासाठी पुढे आले आहेत. हे पोलीसमित्र पोलिसांना त्यांच्या दैनंदित कामात त्यांच्या वेळेनुसार मदत करणार आहेत.
यामध्ये पेट्रोलिंग, नाकाबंदी आणि गोपनीय माहिती देणे आदी मदतकार्याची त्यांच्याकडून अपेक्षा आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात पाच परिमंडळे आहेत. एका परिमंडळात सहा ते सात पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यातील पोलीसमित्र म्हणून पुढे आलेल्या प्रत्येक पोलीसमित्राने पोलिसांच्या मदतीसाठी दिवस आणि वेळ ठरवून दिलेली आहे. मात्र, त्याने घेतलेली जबाबदारी तो पार न पाडता वारंवार दांडी मारून फक्त पोलीसमित्र म्हणून मिरवणार असेल, तर त्यांना या जबाबदारीतून मुक्त करण्यात येणार आहे.
पोलीसमित्रांची भरली होती शाळा
गेल्या शनिवारी शहर आयुक्तालयाच्या आवारात पोलीसमित्रांची शाळा भरली होती. निमित्त होते, ते राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचे ठाणेभेटीचे आणि आढावा बैठकीचे. या वेळी प्रत्येक पोलीस ठाण्यातील दोन महिला आणि दोन पुरुष पोलीसमित्रांना बोलवण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी तब्बल ३५० पोलीसमित्रांनी हजेरी लावली. या वेळी दीक्षितांनी त्यांच्या अडचणी आणि अनुभव जाणून घेतल्या आणि त्यांना मार्गदर्शन केले.