दहा शहरांचा श्वास कोंडला; अनलॉकनंतर वायुप्रदूषण वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 03:38 AM2020-12-13T03:38:52+5:302020-12-13T06:56:13+5:30

यंदा दिवाळीत आणि हिवाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांत राज्यातील हवा गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ पट अधिक प्रदूषित झाली आहे.   

pollution in 10 cities increased after unlock | दहा शहरांचा श्वास कोंडला; अनलॉकनंतर वायुप्रदूषण वाढलं

दहा शहरांचा श्वास कोंडला; अनलॉकनंतर वायुप्रदूषण वाढलं

Next

मुंबई : लॉकडाऊनमध्ये हवेची गुणवत्ता बरीच सुधारली होती. अनलॉकनंतर गर्दी करण्यावर मर्यादा असल्यामुळे तसेच फटाके फोडण्यावर बऱ्यापैकी बंधने आल्यामुळे ती फारशी बिघडली नाही, असा जर तुमचा समज असेल, तर तो तद्दन गैरसमजच होता असे नक्की समजा. कारण अनलॉक आणि त्यापाठोपाठ आलेले दसरा-दिवाळी हे सण आपण इतक्या धडाक्यात साजरे केले की, यंदा दिवाळीत आणि हिवाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांत राज्यातील हवा गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ पट अधिक प्रदूषित झाली आहे.   

दिल्लीच्या सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एन्व्हायर्नमेंट (सीएसई) या पर्यावरणविषयक अभ्यास करणाऱ्या प्रख्यात संस्थेने हा धक्कादायक निष्कर्ष मांडला आहे. 

का वाढले प्रदुषण
अनलॉकनंतर उद्योगधंदे, व्यापार, वाहतूक, बाजार टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर आल्याने वायुप्रदूषणाने पुन्हा एकदा धोक्याची पातळी गाठली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा हवा अधिक दूषित झाली आहे. 

सर्वाधिक प्रदूषित दिवस
 मुंबई, कल्याण
    १५ नोव्हेंबर २०२० रोजी रोजी संपलेला आठवडा
नवी मुंबई, नागपूर, नाशिक
    २९ नोव्हेंबर २०२० रोजी रोजी संपलेला आठवडा
पुणे
    ८ नोव्हेंबर २०२० रोजी 
रोजी संपलेला आठवडा
चंद्रपूर
    १ नोव्हेंबर २०२० रोजी 
रोजी संपलेला आठवडा
औरंगाबाद
    २२ नोव्हेंबर २०२० रोजी रोजी संपलेला आठवडा
सोलापूर
    ६ डिसेंबर २०२० रोजी 
रोजी संपलेला आठवडा

सर्वांत स्वच्छ हवेचे दिवस
 मुंबई, नवी मुंबई, कल्याण, सोलापूर
    ५ जुलै २०२० रोजी संपलेला आठवडा
नागपूर, नाशिक, पुणे
    ऑगस्ट २०२० या महिन्यात
 औरंगाबाद
    २५ मे २०२० रोजी संपलेला आठवडा

अहवालातील बाबी
 बृहन्मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात हवेची प्रदूषण पातळी सध्या धोक्याबाहेर गेली आहे. यंदाच्या हिवाळ्यात स्वच्छ हवेचे दिवस खूप कमी असतील.
 यंदा दोन आठवड्यांपूर्वीच हिवाळ्याची चाहूल लागली. यंदाच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत बृहन्मुंबईत गतवर्षीच्या तुलनेत २५ ते ३० टक्के अधिक वायुप्रदूषण झाले.
ऑक्टोबरमध्ये राज्यातील हवा ४० टक्के अधिक दूषित होती तर हे प्रमाण नोव्हेंबरमध्ये सरासरी ४६ टक्के होते. दिवाळीच्या दिवशी तर प्रदूषणाने ६० टक्क्यांची पातळी गाठली होती. 

स्वच्छ हवेसाठी उपाय
हवेतील प्रदुषण कमी करायचे असेल तर वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, दर्जेदार इंधनाचा पुरवठा, वीज प्रकल्पांतून कमीतकमी प्रदूषण, कचऱ्याची योग्य विल्हेवाट आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिक वापर या उपायांची कटाक्षाने कास धरावी लागेल.     - अमृता रॉयचौधरी, 
    कार्यकारी संचालिका, सीएसई 

Web Title: pollution in 10 cities increased after unlock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.