चार कारखान्यांना प्रदूषण मंडळाचा दणका
By admin | Published: August 4, 2016 02:45 AM2016-08-04T02:45:21+5:302016-08-04T02:45:21+5:30
सांडपाणी केंद्रात योग्य प्रक्रिया केली जात नसल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने अंबरनाथमधील ४६ कारखान्यांच्या सांडपाणी सोडण्यावर बंदी घातली होती.
कल्याण : सांडपाणी केंद्रात योग्य प्रक्रिया केली जात नसल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने अंबरनाथमधील ४६ कारखान्यांच्या सांडपाणी सोडण्यावर बंदी घातली होती. त्यानंतरही चोरून सांडपाणी सोडणाऱ्या चार कारखान्यांना प्रदूषण मंडळाने दणका दिला असून त्यांचे पाणी बंद करण्याची नोटीस बजावली आहे.
सांडपाण्याबाबतची ही नोटीस २ जुलैला बजावली होती. त्यात डोंबिवली व अंबरनाथमधील १४२ कारखान्यांचा समावेश त्यात होता. कारखाने बंद करा, अशी नोटीस मंडळाने बजावली नव्हती; तर कारखान्यातून रासायनिक सांडपाणी प्रक्रियेसाठी सांडपाणी सोडू नका, असे त्यात म्हटले होते. सांडपाणी बंद केल्याने उत्पादन प्रक्रियाच ठप्प झाली. पण नोटीस बजावल्यावरही काही कारखान्यांनी त्यांचे सांडपाणी बंद केले नाही. ते छुप्या पद्धतीने सांडपाणी सोडत असल्याच्या तक्रारी प्रदूषण मंडळाकडे आल्या. त्यांनी पाहणी केली असता चार कारखाने दोषी आढळले. गोदरेज, डिफाईन्स, ज्युबिलन्ट आणि सीमेक्स या कारखान्यांतून सांडपाणी सोडले जात होते. नोटीस देऊनही सांडपाणी सोडणे बंद न केल्याने या कारखान्यांचा पाणी पुरवठाच बंद करण्याची नोटीस प्रदूषण मंडळाने एमआयडीसीला दिली आहे.