प्रदूषण नियमावली एसटीकडून धाब्यावर?
By Admin | Published: March 29, 2017 03:21 AM2017-03-29T03:21:59+5:302017-03-29T03:21:59+5:30
एसटी महामंडळाकडून प्रदूषण नियंत्रण नियमावली धाब्यावर बसवली की काय असाच प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. केंद्राच्या निकषाप्रमाणे
मुंबई : एसटी महामंडळाकडून प्रदूषण नियंत्रण नियमावली धाब्यावर बसवली की काय असाच प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. केंद्राच्या निकषाप्रमाणे युरो-४ नुसार बस दाखल करण्याऐवजी एसटी महामंडळाने युरो-३ प्रमाणे एसटीच्या ताफ्यात बस दाखल केल्या आहेत. स्कॅनिया कंपनीच्या असणाऱ्या या बसेस पर्यावरणस्नेही नसल्याची बाब समोर आल्याने या बस घेण्यामागील नेमके कारण काय असा सवाल उपस्थित होत असून महामंडळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. महत्वाची बाब म्हणजे एसटी महामंडळात व्होल्वो विरुद्ध स्कॅनिया असे छुपे युद्धच सुरु झाले आहे.
एसटी महामंडळाने सध्या व्होल्वो ऐवजी स्कॅनिया कंपनीला बसची आॅर्डर दिली आहे. त्यात ५0 बसमध्ये १५ मल्टिअॅक्सेल बसचा समावेश आहे. परंतु या बसेस केंद्राच्या निकषानुसार नसल्याचे सांगण्यात येते. व्होल्वो कंपनीकडून युरो-४ नुसार बसेस बनविल्या गेलेल्या असतानाच एसटी महामंडळाकडून व्होल्वोऐवजी स्कॅनिया कंपनीलाच पसंती देण्यात आली आहे. स्कॅनियाकडून बी एस ३ प्रकारातील बस महामंडळाला देण्यात येणार असून व्होल्वोकडून बी एस ४ अशी स्वस्त व पर्यावरणस्नेही बस देण्याची तयारी दर्शविण्यात आली होती, तरीही महामंडळाने स्कॅनियालाच निवडले. त्यामुळे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी या उलाढाली करण्यात आल्या आहेत की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल म्हणाले, युरो ४ हे एप्रिल महिन्यापासून लागू होत आहे. यापुढे नवीन बसेस घेताना युरो-४ मधील बस घेतल्या जातील,असे सांगितले, घेण्यात आलेल्या बसेस या भाडे तत्वावरील आहेत. (प्रतिनिधी)
महत्वाचे म्हणजे व्होल्वो बी-८ आर.बी.एस ४ ची किंमत ही ९८ लाख असून स्कॅनियाच्या मेट्रो लिंक बी.एस. ३ ची किंमत ही १ कोटीपेक्षा जास्त आहे. तर व्होल्वोच्या बी ११ आरची किंमत १ कोटी ३0 लाख असून स्कॅनियाच्या बसची किंमत पाच लाखांनी जास्त आहे.