प्रदूषणावर २४ तास लक्ष ठेवणार!
By Admin | Published: February 17, 2015 01:36 AM2015-02-17T01:36:46+5:302015-02-17T01:36:46+5:30
औद्योगिक प्रदूषणाच्या बिकट समस्येवर मात करण्यासाठी प्रदूषणकारी उद्योगांमध्ये मोडणाऱ्या ३ हजार कारखान्यांमध्ये मार्चअखेरपर्यंत प्रदूषण मापक यंत्र बसविण्यात येणार
रत्नागिरी : औद्योगिक प्रदूषणाच्या बिकट समस्येवर मात करण्यासाठी प्रदूषणकारी उद्योगांमध्ये मोडणाऱ्या ३ हजार कारखान्यांमध्ये मार्चअखेरपर्यंत प्रदूषण मापक यंत्र बसविण्यात येणार असून, २४ तास त्यावर लक्ष ठेवले जाईल, असे केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
प्रदूषण मापक यंत्र संगणक कक्षाशी जोडले जाणार आहे. त्याद्वारे कारखान्यात प्रमाणाच्या बाहेर प्रदूषण झाल्यास संगणक केंद्रात लाल दिवा लागेल. त्यामुळे उद्योजकांना फसवणूक करता येणार नाही. प्रदूषण नियंत्रणासाठीचे उपाय करूनही काही उद्योगांकडून त्याचे पालन होत नसल्याचे आढळून आले आहे, असे ते म्हणाले. आजवर प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना कमी प्रमाणात दंड आकारणी केली जात होती; परंतु यापुढे कायदा कडक करण्याबरोबरच दंडाची रक्कमही वाढविली जाणार आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)