परीक्षेच्या तोंडावर पॉलिटेक्निक प्रॅक्टिकल बंद
By admin | Published: September 22, 2016 05:22 AM2016-09-22T05:22:02+5:302016-09-22T05:22:02+5:30
शासकीय तंत्रनिकेतनमधील विविध पदविका अभ्यासक्रमांच्या परीक्षा २७ सप्टेंबरपासून सुरू होत आहेत
लीनल गावडे,
मुंबई- शासकीय तंत्रनिकेतनमधील विविध पदविका अभ्यासक्रमांच्या परीक्षा २७ सप्टेंबरपासून सुरू होत आहेत. मात्र, परीक्षेच्या तोंडावर शासकीय महाविद्यालयातील प्रॅक्टिकल बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल शिकवणाऱ्या निर्देशकांनी असहकार आंदोलन पुकारल्याने, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
येथील शासकीय पॉलिटेक्निकमधील पदविका अभ्यासक्रम ८ आॅगस्ट २०१६ पासून सुरू झाले. विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ज्ञान असणे आवश्यक असते. या प्रॅक्टिकलसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू विद्यार्थ्यांनी हाताळणे जोखमीचे असते. त्यामुळे प्रॅक्टिकलची जबाबदारी निर्देशक सांभाळतात. मात्र, वेतनवाढीसाठी निर्देशकांनी संप पुकारला आणि या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे विद्यार्थी संकटात सापडले आहेत.
न्यायालयाने १६ मार्च २०११ मध्ये कर्मशाळा अधीक्षक आणि निर्देशकांची कामे वाटून दिली. आदेशानुसार, निर्देशकांचे काम विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणे नसून, त्यांना साहित्य काढून देऊन त्यांची हजेरी घेण्यापुरते मर्यादित आहे, असा दावा निर्देशकांनी आता केला आहे. मात्र आदेशांनंतरही गेली पाच वर्षे निर्देशकच विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल घेत होते. निर्देशकांच्या या भूमिकेमुळे ८ आॅगस्टपासून एकही प्रॅक्टिकल झालेले नाही. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांच्या राज्यात ४३ शाखा आहेत. मात्र, सर्वच शाखांमध्ये हीच परिस्थिती असल्याचे कळते.
>निर्देशकांचा दावा...
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक पूर्ण करण्यास मार्गदर्शन करणे, प्रात्यक्षिक पूर्ण करून घेणे. प्रात्यक्षिकांचा अहवाल सादर करणे.
परीक्षेच्या कामकाजात वरिष्ठांच्या सूचनेनुसार काम करणे.
उपकरणांची देखभाल करणे, ही त्यांची कामे नाहीत.
कर्मशाळेतील यंत्र सामुग्रीची व उपकरणाची नियमित दुरुस्ती व देखभाल करणे.
>सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातील प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे वर्कशॉपचे प्रॅक्टिकल सुरू झालेले नाहीत. त्यामुळे शासनाने कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढावा व विद्यार्थ्यांचे नुकसान
टाळावे.
- राजेंद्रकुमार बऱ्हाटे,
(स्थापत्य अभियांत्रिक विभागप्रमुख, शासकीय तंत्रनिकेतन वांद्रे)
२५ वर्षांपासून प्रशिक्षक पॅ्र्रक्टिकलची जबाबदारी सांभाळत आहेत. तसे न्यायालयानेच सांगितले आहे. विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल बंद ठेवणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल न घेणाऱ्यांची वेतन कपात करण्याचे आदेश आहेत.
- डॉ. महाजन, (संचालक, तंत्रशिक्षण)