‘पानसरेंचा खून करणारी विचारधारा सत्तेवर’
By admin | Published: November 23, 2015 02:39 AM2015-11-23T02:39:48+5:302015-11-23T02:39:48+5:30
‘गेल्या काही दिवसांत देशात धर्मांध शक्तींनी डोके वर काढले आहे. देशभर जाणीवपूर्वक असहिष्णुतेचे वातावरण तयार करून धार्मिक उन्माद माजविण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे.
कोल्हार (अहमदनगर) : ‘गेल्या काही दिवसांत देशात धर्मांध शक्तींनी डोके वर काढले आहे. देशभर जाणीवपूर्वक असहिष्णुतेचे वातावरण तयार करून धार्मिक उन्माद माजविण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. ज्या विचारधारेने डॉ. गोविंद पानसरेंचा खून केला, तीच विचारधारा आज सत्तेवर आहे,’ असा घणाघाती आरोप गोविंद पानसरेंच्या कन्या स्मिता पानसरे यांनी केला.
पानसरे, कलबुर्गी व दाभोलकर यांच्या हत्या होऊनही आरोपी मोकाट आहेत. याबाबत सरकारला जाग यावी, म्हणून पानसरेंची जन्मभूमी कोल्हार (ता. राहाता) ते कर्मभूमी कोल्हापूर अशा समता संघर्ष यात्रेला रविवारी कोल्हारमधून प्रारंभ झाला. त्या वेळी पानसरे बोलत होत्या. भाकपचे राज्य सचिव भालचंद्र कांगो, अंनिसचे जिल्हाध्यक्ष अरुण कडू, माजी सरपंच डॉ. संजय खर्डे, सुरेश पानसरे आदी या वेळी उपस्थित होते.
स्मिता म्हणाल्या की, ‘सत्तेवर असणारे सरकार आम्हाला न्याय देईल का, हा प्रश्नच आहे. त्यामुळे त्यांना जाग आणण्यासाठी ही संघर्ष यात्रा आहे. सध्या देशात जातीयवादी संघटना असहिष्णुतेचा माहोल तयार करीत आहेत. त्यांनी मोदींचा चेहरा पुढे करून सत्ता हस्तगत केली आणि देश लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे झुकला. या विरोधात सर्वांनी एकजुटीने सहभागी होऊन पानसरे, दाभोलकरांचे विचार पुढे नेण्यासाठी एकत्र यावे,’ असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, कोल्हारमधून सुरू झालेली ही यात्रा राहुरी, नगर, पारनेर, राळेगणसिद्धी, शिरूर, लोणंद, सातारामार्गे २४ नोव्हेंबरला कोल्हापूरला पोहोचणार आहे. (वार्ताहर)