Pooja Chavan Suicide Case: फडणवीसांनी 'त्या' १२ ऑडिओ क्लिप्स पोलीस महासंचालकांकडे पाठवल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 03:10 AM2021-02-13T03:10:36+5:302021-02-13T07:39:14+5:30
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थता
मुंबई : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील एक २२ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने विविध माध्यमांमध्ये, तसेच समाजमाध्यमांवर विविध प्रकारच्या चर्चा होत आहेत. काही ऑडिओ क्लिप्स फिरत आहेत. बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण असलेल्या या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांकडे पत्राद्वारे केली आहे.
पोलीस महासंचालकांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणातील १२ ऑडिओ क्लिप्स माझ्या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. आपल्या अवलोकनार्थ त्या ऑडिओ क्लिप्सची प्रत या पत्रासोबत जोडत आहे. या ऑडिओ क्लिप्समध्ये बोलणारे कोण आहेत, त्यांच्या संवादाचा नेमका अर्थ काय, त्यातून पूजा चव्हाणची खरोखर आत्महत्या आहे की तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. एकूणच तिच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण यामुळे निर्माण होत आहे. सध्याचा तपास हा वरकरणी होत असल्याचे खेदाने नमूद करावेसे वाटते. ही आत्महत्या किंवा आत्महत्येमागील घटनाक्रम संशयास्पद असल्याचा आरोप बंजारा समाजातून मोठ्या प्रमाणात होतो आहे.
त्यामुळे या सर्व ऑडिओ क्लिप्सची सर्वंकष चौकशी होणे नितांत गरजेचे आहे. ही चौकशी तात्काळ करून बंजारा समाजात अतिशय लोकप्रिय असलेल्या या तरुणीला तात्काळ न्याय द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, असेही फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.
ऑडिओ क्लिप्सची सर्वंकष चौकशीची गरज
बंजारा समाजात अतिशय लोकप्रिय असलेल्या या तरुणीला तात्काळ न्याय द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी समाजातून जोर धरू लागली आहे.
एकूणच तिच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण निर्माण होत असतानाच सध्याचा तपास हा वरकरणी होत असल्याचा आरोप आहे.