कमजोर नव्हती तर महाराष्ट्राची वाघीण होती माझी बहीण! पूजाच्या बहिणीची सोशल मीडियावर पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 04:10 PM2021-02-13T16:10:15+5:302021-02-13T16:16:07+5:30
पूजाच्या बहिणीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून त्यात माझी बहीण कमजोर नव्हती तर महाराष्ट्राची वाघीण होती असे म्हटले आहे.
नेहा सराफ -
पुणे : पुण्यामध्ये 22 वर्षीय युवती पूजा चव्हाण हिने आत्महत्या केल्यानंतर आता या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. महाविकासआघाडी मधल्या एका मंत्र्याचे नाव या प्रकरणात संशयात आले आहे. घडल्या प्रकरणासंदर्भात आता तिच्या बहिणीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून त्यात माझी बहीण कमजोर नव्हती तर महाराष्ट्राची वाघीण होती असे म्हटले आहे.
या पोस्टमध्ये तिने नेमके काय म्हटले पाहुया.. “ दोन दिवसांपासून मी पाहात आहे की, काही विचारपूस न करता, तुम्ही काहीही पोस्ट टाकत आहात. ती फक्त परळी वैजनाथची नाहीतर पूर्ण महाराष्ट्राची वाघीण होती माझी बहीण. पूजा लहू चव्हाण एवढी कमजोर नव्हती की असं काही करेल आणि हे तुम्हाला पण चांगलंपणे माहिती आहे. मला आजसुद्धा विश्वास होत नाही तिने सुसाईड केलं आहे आणि जरी केलं असेल तर मोठीच कोणती तरी गोष्ट असेन. दीदीने नेहमी सर्वांना मदत केली आहे.
काही विचार न करता तिने फक्त बंजारा समाज नाहीतर सर्वांना पाठिंबा दिला आहे. जेवढं होईल तेवढं तिने मदत केली आहे. मी तिची लहान बहीण आहे हे माझं नशीब आहे. ती आज आपल्या सोबत नाही याचं जर तुम्हाला एवढं दु:ख होत असेल, तर विचार करा आम्ही कसा स्वत:ला सांभाळत आहोत. मला आधीच याचा त्रास सहन होत नाही. मम्मी पप्पाला सांभाळायचं आहे अजून. आणि तुम्ही अशा पोस्ट टाकत आहात. निदान तिला जस्टिस मिळू शकत नाही तर अशा पोस्ट करुन आम्हाला त्रास तर देऊ नका. तिला स्वर्गामध्ये शांतीने राहू द्या , ती जर हे सर्व पाहात असेल तर तिला किती त्रास होत असेल विचार करा. अशी भली मोठी पोस्ट तिच्या बहिणीने लिहिली आहे.”
आता या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचक लक्ष घातले असून पुण्याच्या पोलीस आयुक्तांना तपासाचे आदेश देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे केवळ आकस्मात मृत्यूची नोंद करून दाबण्याचा प्रयत्न होतअसलेल्या प्रकरणात आता पूजाला न्यायापर्यंत पोचवणार का हेच बघावं लागणार आहे.