पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; संजय राठोडांना निर्दोषत्व नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 07:14 AM2021-07-17T07:14:53+5:302021-07-17T07:16:25+5:30
तपास सुरू असून कोणालाही निर्दोषत्व बहाल करण्यात आलं नसल्याची पोलिसांची माहिती. ७ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाणनं केली होती आत्महत्या.
पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तिच्या आई-वडिलांनी नव्याने जबाब नोंदविला असून त्यात कोणाविरुद्ध त्यांची तक्रार नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी पूर्ण केल्याचा अहवाल अद्याप सादर केलेला नाही. त्यामुळे तपास बंद करण्यात आलेला नाही. तपास सुरू असून अद्याप कोणालाही निर्दोषत्त्व बहाल करण्यात आलेले नाही, असे परिमंडळ-५ च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या युवतीने वानवडीतील हेवन पार्क इमारतीतल्या सदनिकेतून उडी मारून आत्महत्या केली होती. ही घटना ७ फेब्रुवारीला घडली होती. या प्रकरणाशी तत्कालिन वनमंत्री संजय राठोड यांचे नाव जोडण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. “पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास बंद (क्लोजर रिपोर्ट) करण्यात आलेला नाही,” असे पोलिसांनी स्पष्ट केले.
पंधरा दिवसांपूर्वी वानवडी पोलिसांनी पूजाच्या पालकांचा नव्याने जबाब नोंदविला आहे. त्यांनी त्यांची कोणाविरोधात तक्रार नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात संजय राठोड यांना निर्दोषत्त्व बहाल केल्याचे काही माध्यमांमधून आलेले वृत्त निराधार असल्याचे पोलिसांनी सांगितले.