Video : Pooja Chavan Suicide: 'पूजा अरुण राठोड'च्या गर्भपाताच्या रिपोर्टमुळे चर्चेला उधाण, पण डॉक्टर म्हणतात...
By पूनम अपराज | Published: February 17, 2021 06:48 PM2021-02-17T18:48:15+5:302021-02-17T18:55:05+5:30
Pooja Chavan Suicide: याबाबत वस्तुस्थिती वेगळी असल्याचा खळबळजनक खुलासा खुद्द डॉ. श्रीकांत वराडे यांनी लोकमतशी बोलताना केला आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आणखी मोठी माहिती समोर येते आहे. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूजा अरूण राठोड नावाच्या मुलीचा गर्भपात झाल्याची नोंद आहे. ही पूजा अरूण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. पूजा अरूण राठोड नावाची महिला ६ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजून ३४ मिनिटांनी या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेली होती. तशी नोंद अहवालात आहे. तिचा वॉर्ड क्रमांक ३ होता आणि डॉ. श्रीकांत वराडे यांनी तिच्यावर उपचार केल्याचं रिपोर्टमध्ये दिसतं आहे. मात्र, याबाबत वस्तुस्थिती वेगळी असल्याचा खळबळजनक खुलासा खुद्द डॉ. श्रीकांत वराडे यांनी लोकमतशी बोलताना केला आहे.
डॉ. रोहिदास चव्हाण यांच्या देखरेखीखाली त्या महिलेवर उपचार करण्यात आले आणि दुपारी वाजता घरी सोडण्यात आले होते. डॉ. श्रीकांत वराडे यांनी लोकमतला अधिक माहिती देताना सांगितले की, पूजा अरुण राठोड (२२) या महिलेला मी पाहिलं देखील नाही. मात्र, मी ५ फेब्रुवारीला युनिट २ साठी म्हणजेच सकाळी ९ ते दुसऱ्यादिवशी (६ फेब्रुवारी) सकाळी ९ वाजेपर्यंत कार्यरत होते. दरम्यान, माझं युनिट सुरु असताना युनिट १ चे डॉ. रोहिदास चव्हाण यांनी पहाटे ४.३४ वाजता संबंधित महिलेला रुग्णालयात दाखल करून घेतलं आणि तिला सखी या कक्षात डॉ. चव्हाण यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. डॉ. चव्हाण यांचं युनिट १ हे ६ फेब्रुवारीच्या सकाळी ९ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशीच्या (७ फेब्रुवारी) सकाळी ९ पर्यंत सुरु होते. त्यामुळे या महिलेच्या उपचारही माझा तसूभरही संबंध नसल्याचे डॉ. वराडे यांनी सांगितले. पूजा अरुण राठोड या महिलेबाबत अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही डॉ. रोहिदास चव्हाण यांना संपर्क साधू शकता असे देखील ते पुढे म्हणाले.
Pooja Chavan Suicide Case : 'पूजा अरुण राठोड'च्या गर्भपाताच्या रिपोर्टमुळे चर्चेला उधाण, पण डॉक्टर म्हणतात... pic.twitter.com/d1G7PKxqXl
— Lokmat (@MiLOKMAT) February 17, 2021
डॉ. रोहिदास चव्हाण ६ दिवसाच्या रजेवर होते
यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात OBGY विभागाचे (म्हणजेच जेथे पूजा अरुण राठोड या महिलेवर उपचार करण्यात आले) प्रमुख डॉ. रोहिदास चव्हाण हे गेले सहा दिवस आई आजारी असल्याचे कारण सांगून रजेवर गेले होते. काल १६ फेब्रुवारीला ते हजर राहणार होते. मात्र ते हजर झाले की नाही याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. याबाबत त्यांची बाजू मांडण्यासाठी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाईल स्विच ऑफ लागला.
व्हायरल झालेल्या शॉर्ट केस रिपोर्टमध्ये नेमकं काय ?
शॉर्ट केस रिपोर्टमध्ये रुग्णाचे नाव पूजा अरुण राठोड (२२) असून तिच्यावर जननी शिशु सुरक्षा योजनेअंतर्गत उपचार करण्यात आले. पहाटे ४ वाजून ३४ मिनिटांनी तिला युनिट २ मध्ये वॉर्ड क्रमांक ३ मध्ये दाखल करून घेण्यात आले. या रिपोर्टवर युनिट २ चे प्रमुख म्हणून डॉ. श्रीकांत वराडे यांचे नाव नमूद करण्यात आले आहे. कोणत्याही अडथळ्यांशिवाय गर्भपात करण्यात आल्याचं देखील त्यात नमूद करण्यात आलं आहे.
मध्यरात्री ‘एचएमआयएस’ कक्ष उघडण्यामागील रहस्य काय?
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील उपचारार्थ दाखल रुग्णांची नोंद एचएमआयएस (हाॅस्पिटल मॅनेजमेंट इंटीग्रेटेड सिस्टीम) प्रणालीवर घेतली जाते. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा संदर्भ येताच येथेही हालचाली सुरू झाल्या होत्या. शनिवारी मध्यरात्रीनंतर एचएमआयएस कक्ष उघडण्यात आला होता. इतक्या रात्री हा कक्ष उघडण्यामागील रहस्य गुलदस्त्यात आहे. त्याबाबत तेथील यंत्रणेत वेगवेगळे अंदाज वर्तविले जात असून कक्ष उघडण्याच्या घटनेकडे साशंकतेने पाहिले जात आहे. कक्ष उघडण्याचा हा प्रकार पुणे ग्रामीण पोलिसांसाठी तपासाचा धागा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.