चौथ्या माळेला अंबाबाईची गजलक्ष्मी रूपात पूजा
By admin | Published: October 16, 2015 05:29 PM2015-10-16T17:29:48+5:302015-10-16T17:30:56+5:30
शारदीय नवरात्रौत्सवाच्या चौथ्या माळेला साडेतीन शक्तिपीठांतील एक देवता असणा-या करवीरनिवासिनी अंबाबाईची गजलक्ष्मीच्या रूपात पूजा बांधण्यात आली.
Next
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. १६ - शारदीय नवरात्रौत्सवाच्या चौथ्या माळेला साडेतीन शक्तिपीठांतील एक देवता असणा-या करवीरनिवासिनी अंबाबाईची गजलक्ष्मीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. नवरात्रौत्सवातील शुक्रवार असल्याने भाविकांनी दर्शनासाठी उच्चंकी गर्दी केली होती.
शुक्रवार म्हणजे शक्तीच्या उपासनेचा वार; त्यामुळे अंबाबाई मंदिरात पहाटेपासून भाविकांच्या लांबच लांब दर्शनरांगा लागल्या होत्या. सकाळी निवृत्त विशेष पोलीस महासंचालक माधवराव सानप यांच्या हस्ते अंबाबाईला शासकीय अभिषेक करण्यात आला. त्यानंतर देवीची गजलक्ष्मीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. अष्टलक्ष्मींतील चौथी देवता श्री गजलक्ष्मी ही समुद्रमंथनातून उत्पन्न झाली. ही दुर्भाग्याचा नाश करून सर्वसौख्य देणारी देवता आहे. दुर्वास ऋषींनी दिलेल्या देवप्रसादाचा उन्मत्त इंद्राने अपमान केला, तेव्हा ‘तुम्हा देवांची सर्व संपदा क्षीरसागरात जावो,’ असा त्यांनी शाप दिला. पर्यायाने लक्ष्मीदेखील सागरात गेल्या. देव-दैत्यांनी सागरमंथन करताच जी चौदा रत्ने प्रकट झाली, त्यांपैकी एक म्हणजे लक्ष्मी. त्या प्रकट होताच ऐरावत, पुण्डरिक, वामन, कुमुद, अज्जन, पुष्पदंत, सार्वभौम, सुप्रतीक या आठ दिशांच्या धारणकत्र्या हत्तींनी त्यांना अभिषेक घातला. या देवतेच्या उपासनेने गजांत धन व समृद्धी लाभते.