अटकेच्या भीतीने पूजा खेडकर दुबईला पसार? दिल्लीत कोणत्या नेत्याच्या घरी लपलेली...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 08:12 AM2024-08-02T08:12:12+5:302024-08-02T08:12:52+5:30

सूत्रांच्या माहितीनुसार, पूजा खेडकर दिल्लीतच एका मोठ्या नेत्याच्या घरी मुक्कामी होती. अटकपूर्व जामीन फेटाळला जाईल, याची कुणकुण लागताच ती दुबईला पसार झाल्याचे कळते.

pooja khedkar spread to dubai for fear of arrest after delhi session court rejects anticipatory bail plea | अटकेच्या भीतीने पूजा खेडकर दुबईला पसार? दिल्लीत कोणत्या नेत्याच्या घरी लपलेली...

अटकेच्या भीतीने पूजा खेडकर दुबईला पसार? दिल्लीत कोणत्या नेत्याच्या घरी लपलेली...

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: दिल्लीतील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पूजा खेडकर दुबईला पळून गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. पूजाला अटकपूर्व जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिल्यानंतर दिल्ली पोलिस तिच्यावर कधी कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

इतर मागासवर्ग प्रवर्गातून पूजा खेडकरने १२ वेळा परीक्षा दिल्याचे उघड झाले आहे. मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीतही गैरवर्तनामुळे आठ वेळा मेमो देण्यात आला होता. २०२२ मध्ये आयएएसमध्ये निवड होण्यासाठी इतर मागासवर्ग प्रवर्गातील नॉन क्रीमीलेयर प्रमाणपत्राचाही लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. 

या कारणांवरून केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा खेडकर हिच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी दिल्लीत गुन्हा दाखल केला होता. अटक होऊ नये, यासाठी तिने दिल्लीतील पटियाला हाउस या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर बुधवारी तसेच गुरुवारी सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने तिचा जामीन फेटाळला. त्यामुळे पूजाला केव्हाही अटक होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.

दिल्लीत एका नेत्याच्या घरी मुक्काम?

सूत्रांच्या माहितीनुसार, पूजा खेडकर या काळात दिल्लीतच एका मोठ्या नेत्याच्या घरी मुक्कामी होती. अटकपूर्व जामीन फेटाळला जाईल, याची कुणकुण लागताच ती दुबईला पसार झाल्याचे कळते.

यूपीएससीमधील ‘त्या’ व्यक्तीचीही चौकशी करा, न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : आयएएस परीक्षा देण्याकरिता अन्य मागासवर्गीय तसेच दिव्यांग यांच्यासाठी असलेल्या आरक्षणाचा गैरफायदा घेणे व त्याद्वारे फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन देण्यास नकार देतानाच यूपीएससीमधील एखाद्या व्यक्तीने पूजा खेडकरला गैरप्रकारांमध्ये मदत केली असेल तर त्याचीही दिल्ली पोलिसांनी चौकशी करावी, असा आदेश दिल्लीतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश देवेंद्रकुमार जंगला यांनी गुरुवारी पोलिसांना दिला.

तसेच, आयएएस परीक्षेत अन्य मागासवर्गीय तसेच दिव्यांगांसाठी असलेल्या राखीव जागांचा आणखी कोणी उमेदवाराने दुरुपयोग केला आहे का याचाही तपास दिल्ली पोलिसांनी करावा, असाही आदेश न्यायाधीशांनी दिला. पूजाने अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावरील निर्णय दिल्ली न्यायालयाने बुधवारी राखून ठेवला होता. 

पूजा खेडकरला अटक केली जाण्याची शक्यता वाटत आहे असे तिच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान सांगितले होते. सरकारी पक्ष व यूपीएससीच्या वकिलांनी तिच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध केला होता. यूपीएससीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, पूजा खेडकरने कायद्याचा भंग केला आहे. तसे ती अजूनही असे कृत्य करण्याची शक्यता आहे.

 

Web Title: pooja khedkar spread to dubai for fear of arrest after delhi session court rejects anticipatory bail plea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.