पुण्याची मुस्कान दहावीत पहिली
By admin | Published: May 30, 2017 04:28 AM2017-05-30T04:28:15+5:302017-05-30T04:28:15+5:30
सीबीएसईच्या निकालानंतर सोमवारी दुपारी आॅनलाइन जाहीर झालेल्या इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (आयसीएसई) दहावी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सीबीएसईच्या निकालानंतर सोमवारी दुपारी आॅनलाइन जाहीर झालेल्या इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (आयसीएसई) दहावी, बारावी निकालांमध्ये मुलींचे वर्चस्व दिसून आले. पुण्याच्या हचिंग्स हायस्कूलमधील मुस्कान अब्दुल्ला पठाण या विद्यार्थिनीने ९९.४ टक्के गुण मिळवून देशात पहिला क्रमांक पटकाविला. मुंबईतील फरझान भरुचा या विद्यार्थ्याने दहावीत ९९.२० टक्के मिळवून देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे, तर बारावीत ९९.२५ टक्के मिळवत रिशिका धारीवाल हिने देशात दुसरा क्रमांक पटकावला.
राज्यातून एकूण १८७ शाळांमधून १७ हजार ६४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती, तर ४२ शाळांमधून २ हजार ३१८ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. आयसीएसईचा राज्याचा दहावीचा निकाल हा ९९.८१ टक्के लागला असून बारावीचा (आयएससी) निकाल ९८.७१ टक्के लागला आहे. दहावीमध्ये ९९.९० टक्के मुली तर ९९.७३ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. बारावीला मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.१० टक्के तर मुलांचे ९८.२६ टक्के इतके आहे.
राज्यातून दहावीच्या परीक्षेला एकूण ९ हजार ३२९ मुले बसली होती. त्यापैकी २५ मुले नापास झाली, तर ७ हजार ७०२ मुलींपैकी फक्त ८ मुली नापास झाल्या. बारावीला एकूण १ हजार ७२ मुले बसली होती, त्यापैकी १९ नापास झाली. तर १ हजार २१६ मुलींपैकी ११ मुली नापास झाल्या. दहावीचे मागासवर्गीय ५०१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, तर अनुसूचित जातीमधून १०१ विद्यार्थी बसले होते. त्यांचा निकाल १०० टक्के लागला. बारावीला इतर मागासवर्गीय ४३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ९५.३५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर अनुसूचित जातीतून २८ तर इतर मागासवर्गीयांतून ९८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी अनुक्रमे ८५.७१ व ९३.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
दहावीच्या चार विद्यार्थ्यांनी रुग्णालयातून परीक्षा दिली. एकाला ९० टक्के गुण मिळाले. बारावीच्या १४ पैकी दोन अंध विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले.
मानसशास्त्राविषयी अनेक लोकांच्या मनात गैरसमज आहेत. हा विषय खूप चांगला आहे. लोकांना मदत व्हावी म्हणून मी पुढे मानसशास्त्र या विषयात दिल्ली विद्यापीठातून पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या विचारात आहे. बारावीला मी सातत्याने अभ्यास करत होते. याचा मला फायदा झाला. - रिशिका धारीवाल, ९९.२५ टक्के,
बारावी, देशात दुसरी, मुंबई
दहावीच्या पहिल्या दिवसापासून अभ्यास सुरू केला होता. अभ्यासाचा ताण आला की सायकलिंग करायचो. फूटबॉल खेळायचो. पुढे मला इंजिनीअरिंग करायचे आहे.
- फरझान भरुचा, ९९.२० टक्के, दहावी,
देशात दुसरा, मुंबई
मुस्कानला व्हायचयं डॉक्टर
आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत देशात पहिल्या आलेल्या पुण्याच्या मुस्कान पठाणला भविष्यात डॉक्टर व्हायचे असल्याचे तिने सांगितले. तिच्या कुटुंबात आईसह १४ जण डॉक्टर असून कुटुंबाच्या रूग्णसेवेची हिच परंपरा पुढे न्यायचे असल्याचे तिने सांगितले.