पूजाच्या वडिलांनी मांडली होती कर्जाची कैफियत, बँकेकडून आलंय स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 10:00 PM2021-02-15T22:00:44+5:302021-02-15T22:03:03+5:30
Pooja Chavan Case : कर्जाचे हप्ते भरण्यासाठी बँकेने पूजावर कोणताही तगादा लावला नसल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पूजाने आत्महत्या कशामुळे केली असा सवाल निर्माण होत आहे.
पूजावर बँकेचे कर्ज असल्यामुळे ती तणावाखाली होती आणि त्यातच बँकेने कर्जाचा तगादा लावला होता, सरकारने कोणतीही मदत केली नाही, खूप नुकसान झाले असं पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी काल आपबिती सांगितली होती. मात्र, कर्जाचे हप्ते भरण्यासाठी बँकेने पूजावर कोणताही तगादा लावला नसल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पूजाने आत्महत्या कशामुळे केली असा सवाल निर्माण होत आहे.
पूजा चव्हाणने बीडच्या गांधी मार्केट परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून पोल्ट्री व्यवसायासाठी साडे तेरा लाखांचे कर्ज घेतलं होतं. बँकेने २०१८ मध्ये पूजाला कर्ज मंजूर केलं होतं. तिला दोन लाखांची सबसीडीही देण्यात आली होती. कर्ज घेण्यासाठी तिने परळीतील घर आणि वसंत नगर तांड्यातील एक एकर शेती तारण म्हणून ठेवली होती. तिला दरमहा ३५ हजार ५०० रुपयांचा हप्ता भरावा लागत होता. तिने कर्जाचे १२ हप्तेही भरले होते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात तिला कर्जाचे हप्ते भरता आले नव्हते. पूजाला कर्जाचे हप्ते भरता आले नसले तरी बँकेकडून हप्त्यांसाठी तिला कोणताही तगादा लावण्यात आलेला नव्हता. तिला नोटीसही पाठवण्यात आली नव्हती, असं एसबीआयने स्पष्ट केलं आहे. मात्र, एसबीआयच्या या अधिकाऱ्याने कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला अशी माहिती टीव्ही ९ ने दिली आहे. त्यामुळे पूजा चव्हाण मृत्यूचं गूढ आणखीन वाढलं आहे.
बँकेचं कर्ज असल्याने पूजा तणावात होती. बँकेकडून कर्जाबाबत तिला सतत विचारणा करण्यात येत होती. त्या तणावामुळेच तिने आत्महत्या केली असावी असे पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी काल म्हटलं होतं. मात्र, पूजाचे आजोबा या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी करत आहेत. तसेच पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी पूजाच्या दोन मित्रांना अटक करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे पूजाच्या कुटुंबातच पूजाच्या मृत्यूबाबत दोन वेगळी मते असल्याचं दिसून येत आहेत.
काल लहू चव्हाण काय म्हणाले?
पूजाने पोल्ट्री व्यवसायासाठी २५ ते ३० लाखांचं कर्ज घेतलं होतं. मात्र, लॉकडाऊनमुळे धंद्यात खोट आल्याने ती तणावात होती, असं सांगत कर्जाच्या तणावात पूजाने आत्महत्या केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. तिच्यावर २५ ते ३० लाखांचं कर्ज होतं. पप्पांचं चांगलं व्हावं म्हणून तिने तिच्या नावावर कर्ज घेतलं होतं. तिला पोल्ट्री काढायची होती. बांधकाम केलं. बॅच टाकला. पण कोरोना आल्यामुळे आम्ही सर्वांना कोंबड्या फूकट वाटल्या. पोल्ट्रीतून आम्हाला एक रुपयाही आला नाही. सरकारला मदतीसाठी अर्ज दिला. मदतही मिळाली नाही. नंतर बर्ड फ्लू आला. त्यातही नुकसान झालं. त्यामुळे तिच्यावर मोठं संकट ठाकलं होतं. त्यावेळी मी तिला बेटा घाबरू नको, माझी २५ लाखाची एलआयसी आहे. त्यावरून कर्ज घेऊ म्हणून सांगितलं. एलआयसीवर मला चार-पाच लाखाचं कर्जही मिळालं. त्यानंतर एक दिवस पूजा म्हणाली गावाकडे मन लागत नाही. पुण्याला जाते. जाताना मी तिला २५ हजार रुपये खर्चाला दिले होते, असं त्यांनी पुढे सांगितलं होतं.