पंकजा मुंडेंच्या 'त्या' फेसबुक पोस्टवर बोलताना, पूनम महाजन म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 04:14 PM2019-12-02T16:14:06+5:302019-12-02T16:14:45+5:30
ट्विटरवरुन भाजपा नावाचा उल्लेखदेखील काढून टाकला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे भाजपा सोडणार अशीही चर्चा सुरु आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज्यातले अनेक प्रमुख नेते शिवसेनेच्या वाट्यावर आहेत. पंकजा मुंडे काय करतात, ते 12 डिसेंबरला कळलेच, असं सूचक विधान राऊत यांनी केलं होतं. मात्र, या प्रकरणी आता भाजप खासदार पूनम महाजन यांनी राऊत यांचा दावा खोटा असल्याचा सांगत पंकजा मुंडे भाजपमध्येचं राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्यातील सत्ता गमावल्यानंतर भाजपामधील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसेंसह अनेक वरिष्ठ नेत्यांची तिकीटं कापण्यात आली होती. पंकजा मुंडेंना बीडच्या परळीमधून उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर त्या सक्रिय राजकारणापासून काहीशा दूर गेल्या आहेत. त्यांनी ट्विटरवरुन भाजपा नावाचा उल्लेखदेखील काढून टाकला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे भाजपा सोडणार अशीही चर्चा सुरु आहे.
मात्र यावर बोलताना पूनम महाजन म्हणाल्या की, पंकजा मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टचा अर्थ कोणताही राजकीय अर्थाने घेऊ नका.ती माझी बहीण आहे आणि माझा तिच्याशी दररोज संपर्क होत असतो.पराभव झाल्यावर मनावर परिणाम होतो,मी देखील या परिस्थितीतून गेली आहे.त्यामुळे मी तिची सध्याची मनस्थिती समजू शकते. त्यामुळे पंकजा भाजप सोडून जातील, मला असे काही वाटत नसल्याचे पूनम महाजन म्हणाल्या.
तर पंकजा मुंडे या भाजपाच्या नेत्या होत्या, आजही आहेत अन् उद्याही असतील, असे म्हणत पंकजा मुंडेंच्या शिवसेना प्रवेशाचे वृत्त चंद्रकांत पाटील यांनी फेटाळून लावले. भाजपाच्या आजच्या स्थितीमध्ये गोपीनाथ मुंडेंचं मोठं योगदान आहे. पंकजा मुंडे या गोपीनाथ मुडेंनी उभारलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्या, नेत्या आहेत. त्यामुळे, भाजपा सोडून इतर कुठल्याही पक्षासोबत त्या जाणार नसल्याचं पाटील यांनी म्हटलंय.