पूनम महाजनांची संपत्ती १०८ कोटींवरून २ कोटींवर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 06:05 AM2019-04-06T06:05:14+5:302019-04-06T06:05:44+5:30
कर्ज फेडण्यासाठी मालमत्ता विकल्या
मुंबई : राजकारण्यांची संपत्ती उड्डाणे घेत असताना पूनम महाजन यांच्या संपत्तीत घट झाली आहे. उत्तर मध्य मुंबईतून रिंगणात असलेल्या भाजपच्या महाजन यांच्या संपत्तीत १०६ कोटींची घट झाली आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती आहे.
२०१४ च्या प्रतिज्ञापत्रानुसार महाजन व त्यांच्या पतीकडे १०८ कोटींची संपत्ती होती. महाजन यांनी शुक्रवारी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्या व पतीकडे मिळून २ कोटी २१ लाख ०३ हजार ७४३ रुपयांची जंगम संपत्ती आहे. त्यांच्याकडे स्थावर संपत्ती नाही. महाजन यांच्याकडे २०१४ मध्ये महाजन१८ कोटी ८५ लाख ७१ हजार २०८ रुपयांची व पतीकडे २७ कोटी ६५ लाख २७ हजार ८५३ रुपयांची अशी ४६ कोटी ५० लाख ९९ हजार ६१ रुपयांची जंगम संपत्ती होती. त्यामध्ये सोने, चांदी, हिरे, वाहन, शेअर्सचा समावेश होता. स्थावर मालमत्तेची किंमत २६ कोटी ५५ लाख १५ हजार ४९० व पतीच्या मालकीची ३५ कोटी १ लाख ३८ हजार ४९० रुपयांची मालमत्ता होती. सर्व मिळून १0८ कोटी ७ लाख ५३ हजार ४२१ रुपयांची संपत्ती होती ती आता २ कोटी २१ लाख ०३ हजार ७४३ रुपयांवर आली आहे.
महाजन म्हणाल्या, गेल्यावेळी संपत्ती जाहीर केली त्यात कर्जही होते. ते फेडण्यासाठी मालमत्ता व संपत्तीचा वापर केला. पतीच्या आॅटोमोबाईलचा व्यवसाय ठप्प झाल्याने संपत्ती उरलेली नाही.