राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीयांना मोफत कोरोना लस मिळावी- फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 10:36 PM2021-01-07T22:36:32+5:302021-01-07T22:36:58+5:30
विरोधी पक्षनेते फडणवीस यांची राज्य सरकारकडे मागणी
ठाणे: लसी संदर्भात जे प्रोटोकॉल आहेत. ते केंद्र आणि राज्य सरकारने मिळून ठरविले आहेत. पहिल्यांदा फ्रंट लाईन वर्करला लस मोफत मिळणार आहे, अनेक राज्यांनी सर्वांना लस मोफत देणार हे घोषित केले आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रानेदेखील केंद्र सरकारची मदत घ्यावी आणि किमान गरीब आणि मध्यमवर्गीयांना ही लस मोफत देता येईल, अशी भाजपची मागणी असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात गुरुवारी एका कार्यक्रमात व्यक्त केली. यावेळी फंड बाबत राज्य सरकारची रोजचीच बोबाबोंब असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.
ठाण्यातील कोपरी येथे भारतरत्न अटल कमानीचे लोकार्पण सोहळा फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. तसेच नगरसेवक भरत चव्हाण यांनी श्री नवचंडी महायज्ञाच्या ठिकाणी नवदुर्गा यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. याचदरम्यान फडणवीस यांच्या हस्ते नवदुर्गांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खासदार कपिल पाटील,आमदार तथा जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, नगरसेवक चव्हाण आदी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, २०२१ मध्ये कोरोनाचा शेवट होईल. तसेच आईचा (देवी) आशीर्वाद आणि शक्ती घेऊन जोमाने काम करू, असेही ते म्हणाले.