गरिबांचा विठ्ठल होतोय 'श्रीमंत'
By Admin | Published: July 12, 2016 03:49 PM2016-07-12T15:49:44+5:302016-07-12T16:01:17+5:30
गरिबांचा, शेतकऱ्यांचा आणि वारकऱ्यांचा देव म्हणून विठ्ठलाची ख्याती आहे;
दीपक होमकर/ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. 12- गरिबांचा, शेतकऱ्यांचा आणि वारकऱ्यांचा देव म्हणून विठ्ठलाची ख्याती आहे; मात्र गेल्या सहा दिवसांतच लाखो गरिबांनी पाच-पन्नास रुपयांची देणगी देत विठ्ठलाला तब्बल बावीस लाखांचा मालक बनविला आहे. वारीच्या पंधरा दिवसांमध्ये सुमारे दीड कोटीपर्यंत हा आकडा जाण्याचा अंदाज असून, यंदाच्या वारीतही गरिबांचा विठ्ठल पुन्हा कोट्यधीश होणार आहे.
आषाढी यात्रेच्या पालख्या अद्याप पंढरपूर तालुक्यात प्रवेश करण्याच्या चार दिवस आधीच पंढरपुरात दररोज दोन लाखांहून अधिक भाविक पांडुरंगाचे दर्शन घेत आहेत. त्यामुळे रात्रंदिवस सुरु असलेली दर्शनबारी मंदिरात आल्यावर अगदी आठ-दहा फुटांवर विठ्ठल मंदिराच्या देणगी विभागाचे काउंटर लागले आहेत.
मंदिराचा आतील परिसर, तुकाराम भवन आणि दर्शन मंडप येथे मिळून नवीन अठरा देणगी काउंटर तयार करण्यात आले आहेत. त्याशिवाय कायमस्वरुपीचे तीन कॉम्प्युटर पावती देणारे काउंटर आहेत. तसेच दहापेक्षा जास्त देणगी (हुंडी) पेट्या मंदिरात ठिकठिकाणी बसविण्यात आल्या आहेत.
आषाढ महिन्याच्या पहिल्याच दिवशी एक लाख चौदा हजार पाचशे ८९ रुपयांची देणगी पावत्यांद्वारे झाली होती. प्रत्येक दिवशी वाढत आषाढमधील सहाव्या दिवशी हा आकडा तब्बल आठ लाख ७३ हजार पन्नास रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या सहा दिवसांची मंदिराकडे देणगीपोटी २२ लाख ७४ हजार ९६२ रुपये इतकी देणगी आली होती. गेल्या आषाढीला ही रक्कम २२ लाख ३० हजार १७२ इतकी आहे. यंदा पावसाला बऱ्यापैकी सुरुवात झाल्यामुळे वारकऱ्यांची गर्दी गतवर्षीपेक्षा जास्त होणार हे निश्चित आहे. एकादशीच्या चार दिवस आधी दररोज दहा लाखांहून अधिक देणगी जमा होते. त्यामुळे यंदाही तेच चित्र दिसणार असून, दरवर्षीपेक्षा विक्रमी देणगी जमा होण्याची शक्यता मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
अधिकाऱ्यांमुळे देणगी विभाग पारदर्शी
नवीन कार्यकारी अधिकारी रवींद्र कुलकर्णी यांच्या कडक शिस्तीमुळे अवघ्या मंदिर समितीमध्ये वेगळी शिस्त दिसून येत आहे. शिवाय देणगी विभागातही पारदर्शीपणा येण्यासाठी दररोजचे कलेक्शन आणि त्यांची वर्गवारी अपडेट केली जात आहे. त्यामुळे दरदिवसाला गेल्या वर्षीची तुलनात्मक आकडेवारी उपलब्ध होत आहे. शिवाय भाविकांच्या सोयीसाठी ते सातत्याने झटत असल्याने यंदा भाविक मोठ्या प्रमाणात दर्शन घेऊ शकतील व जितके जास्त भाविक दर्शन घेतील तितकी दानपेटी भरून जाणार आहे.