नेरळ - कळंब रस्त्याची दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2016 02:52 AM2016-09-24T02:52:15+5:302016-09-24T02:52:15+5:30
कर्जत तालुक्यातील नेरळ -कळंब रस्त्यावर महिनाभरापूर्वी भरलेले खड्डे गायब झाले
नेरळ : कर्जत तालुक्यातील नेरळ -कळंब रस्त्यावर महिनाभरापूर्वी भरलेले खड्डे गायब झाले असून पुन्हा रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन कसे चालवायचे, असा प्रश्न वाहनचालकांना पडला असून रस्त्यावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावर बांधकाम विभाग लक्ष देणार का, असा प्रश्न वाहनचालक, प्रवासी व स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
कर्जत तालुक्यातील नेरळ -कळंब हा महत्त्वाचा रस्ता असून मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून वाहने ये-जा करत असतात. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने गणेशोत्सव काळात बांधकाम विभागाने खड्डे भरण्याचे थातूरमातूर काम केल्यानेच पुन्हा रस्त्यांची अवस्था जैसे थे झाली आहे. महिन्याभरातच भरलेले खड्डे गायब झाल्याने वाहनचालक व प्रवाशांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वाहन खराब होण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. खड्डे चुकवताना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच रस्त्याच्या साईडपट्टीवर मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून ते झुकल्याने रस्ताही अरु ंद झाला आहे.
तसेच आठवडाभरापासून पावसाने धुमाकूळ घातल्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. साचलेल्या पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहन जोरात आपटून साचलेले पाणी वाहनचालकांच्या अंगावर उडते. याचा त्रास प्रवाशांना होत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने यांची त्वरित दखल घ्यावी, अन्यथा या रस्त्यावर अपघातात घडल्यास बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल अशा इशारा स्थानिक ांनी दिला आहे. गणेशोत्सवादरम्यान थातूरमातूर खड्डे भरल्याने पुन्हा रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी लवकर हा रस्ता चांगल्या दर्जाचा करावा, अन्यथा बांधकाम विभागाविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मानवाधिकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण मोरगे यांनीदिला आहे. (वार्ताहर)
>खड्डे भरणार
नेरळ-कळंब रस्त्यावर दोन वेळा खड्डे भरण्यात आले होते. जोरदार पावसामुळे पुन्हा खड्डे पडले आहेत. रस्त्याची पाहणी करु न पुन्हा या रस्त्यावरील खड्डे भरण्यात येतील, असे उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रशेखर सहनाल यांनी सांगितले.