अवकाळीचे दृष्टचक्र थांबेना!

By admin | Published: March 5, 2016 04:15 AM2016-03-05T04:15:00+5:302016-03-05T04:15:00+5:30

अवकाळी पावसाचे दृष्टचक्र थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून गुरुवारी रात्री व शुक्रवारी पुन्हा राज्यातील काही भागांना पावसाचा फटका बसला.

Poor visionary stops! | अवकाळीचे दृष्टचक्र थांबेना!

अवकाळीचे दृष्टचक्र थांबेना!

Next

मुंबई : अवकाळी पावसाचे दृष्टचक्र थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून गुरुवारी रात्री व शुक्रवारी पुन्हा राज्यातील काही भागांना पावसाचा फटका बसला. खान्देशासह नाशिक, अहमदनगरमध्ये पावसामुळे कांदा व द्राक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. चंद्रपूर व नगरमध्ये दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला.
नगर जिल्ह्यातील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना पावसाचा फटका बसला आहे़ नगर, श्रीगोंदा, नेवासा, संगमनेर, अकोले आणि कोपरगाव तालुक्यातील ८५ गावांतील सहा हजार शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे़ वादळी वाऱ्याने काही ठिकाणी घरांची पडझड झाल्याने लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत़ जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून कुठे ना कुठे वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे़ जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार सहा हजार ३९२ शेतकऱ्यांच्या ३ हजार ४५१ हेक्टर क्षेत्रावरील कांदा, डाळींब, आंबा यांसारख्या नगदी पिकांना तडाखा बसला आहे़ गारपिटीने आंब्याचा मोहर गळाला़ कांदा शेतात भिजला़ गारपिटीने शेकडो एकरवरील डाळिंबाच्या बागांची नासाडी झाली़ २६ घरांची पडझड झाली असून, वीज पडून १८ जनावरे दगावली आहेत़
नाशिक जिल्ह्यात चार दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपिटीने गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. चार दिवसांत वीज पडून चौघांचा मृत्यू झाला, २९ जनावरे दगावली. गुरुवारी रात्रभर शहराला अवकाळी पावसाने झोडपले. रात्रभर शहरातील वीजपुरवठा खंडित होता. जिल्ह्यात कांद्याचे २,४५५, गव्हाचे ८९७ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले. जिल्ह्यातील एकूण ६ हजार ७७६ शेतकऱ्यांच्या तीन हजार ९०५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला.
शुक्रवारी चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील घुग्घूस, नागभीड, ब्रह्मपुरी, भद्रावती, सावली, मूल, राजुरा आदी तालुक्यांना या पावसाने झोडपले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
> रायगड, नवी मुंबईत नुकसान
नवी मुंबई : अवकाळी पावसामुळे शहरात, रायगड जिल्ह्यास सर्वांचीच तारांबळ उडवली. रसायनीत गारा पडल्या तर वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याचे प्रकारही काही ठिकाणी पहायला मिळाले. अलिबाग, माथेरान तालुक्यात घरावर झाडे पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले. तर घरांचे छप्पर उडून गेल्याने काहींचे संसार उघड्यावर पडले.
अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पालेभाज्या, पांढरा कांदा, कडधान्य, आंबा पिकाला फटका बसला आहे. पनवेल, कामोठे, कळंबोली परिसरात वीटभट्टीमालकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.
> ठाणे जिल्ह्यात
भाज्यांचे नुकसान
ठाणे : गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही भागांत पावसाचा शिडकावा झाल्याने वातावरणात आलेला गारवा कायम असतानाच शुक्रवारी सकाळी अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसाने फळभाज्या, पालेभाज्यांचे नुकसान झाले. काही ठिकाणी आंब्याचा मोहर गळून पडला. हवेत गारवा आल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी दिवा व बदलापूर येथे झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वाहतूक अर्धा तास विस्कळीत झाली. तर भार्इंदर आणि मुरबाड परिसरात झाडे पडल्याने वाहतूककोंडी झाली होती.
गेले काही दिवस उकाड्याने ठाणेकर हैराण झाले होते. शुक्रवारी सकाळी वाऱ्यासोबत आलेल्या सरींनी हवेत गारवा आला. मुरबाड, शहापूर व अन्य ग्रामीण भागांत काकडी, वांगी, भेंडी अशा भाज्यांचे तसेच पालेभाज्यांचे नुकसान झाले. सुदैवाने जिल्ह्यात कोठेही दुर्घटना घडली नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाने सांगितले.
> ४१० गावे बाधित
या गारपीटीमुळे जिल्ह्यातील ४१० गावे बाधित झाली आहेत. यामध्ये नागपूर ग्रामीणमधील सर्वाधिक ९७ गावे बाधित झाली आहेत. यामध्ये १५२७ कुटुंबे बाधित झाली असून सावनेर तालुक्यात सर्वाधिक
१४८८ कुटुंब बाधित झाले आहेत. एका व्यक्तिचा
मृत्यू झाला आहे.
संपूर्ण जिल्ह्यात १८१ जनावरांचा मृत्यू झाला
असून ती सर्व कटोल तालुक्यातील आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला असून लाखो रुपयांच्या नुकसानीचा अंदाज आहे.गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातही रबी पिकांना फटका बसला आहे.
> विदर्भात हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांना झळ
नागपूर : काही दिवसांपूर्वी नागपूरसह जिल्ह्यात वादळांसह अवकाळी पाऊस आला. काही ठिकाणी गारपीटही झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी तातडीने नुकसानीचे सर्क्षेक्षण करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्राथमिक नुकसानीचा अहवाल आला असून २७ फेब्रुवारी ते
१ मार्च दरम्यान नागपूर जिल्ह्यातील १६,३९०.४२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. यात काटोल व कळमेश्वर तालुक्यात सर्वाधिक नुकसान आहे.
दोघांचा मृत्यू : नगर जिल्ह्यातील बारागाव नांदूर येथे विजेच्या तारेवर झाड कोसळून तार तुटली़ त्यावर पाय पडून सलिमा मनीफ देशमुख (४५) यांना शॉक बसून त्यांचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील मंगी (बु.) येथे वीज पडून मलकू आडे (६०) हा शेतमजूर जागीच ठार झाला.
खान्देशात केळीला फटका
खान्देशात चार हजार हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. गहू, पपई आणि केळीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पंचनामे सुरु झाले आहेत.
वऱ्हाडात २० हजार हेक्टरवर नुकसान
सलग तीन दिवस झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसाने वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांतील रब्बी पिकासंह भाजीपाला व फळ पिकांचे नुकसान झाले आहे.अंदाजानुसार यवतमाळमध्ये आठ हजार १९५ हेक्टर, बुलडाण्यात एक हजार ८५०, वाशिममध्ये १,१२०, अकोला २११ व अमरावतीत नऊ हजार २८ हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे नुकसान झाले.
>>अमरावती विभागात २१ हजार हेक्टर बाधित, साडेदहा हेक्टरमधील गव्हाचे नुकसान
अमरावती : २७ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे विभागातील २१ हजार ३९२ हेक्टरमधील शेतीपिके व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. रबी हंगाम सवंगणीला आला असताना निसर्गाच्या या दुष्टचक्रामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे विभागातील २६ तालुक्यांमधील ३९२ गावांमधील २१,३९२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यामध्ये गहू पिकाचे १० हजार ४४७ हेक्टर, हरभरा पिकाचे ३६४३ हेक्टर, कपाशी ४ हेक्टर, ज्वारी १११ हेक्टर, भाजीपाला १८०३ हेक्टर, मका ३५० हेक्टर, फळपिके ४७३७ हेक्टर व ईतर पिकांचे २२८ हेक्टर क्षेत्रात नुकसान झालेले आहे. गव्हाचे पीक ओंबीवर असताना गारपीट झाल्याने गहू जमिनीवर पडला यामुळे दाणा बारीक होणार आहे तर हरभऱ्यांच्या घाट्याचे नुकसान झाले आहे. यामुळे सरासरी उत्पन्नात कमी येणार आहे. संत्र्याच्या मृगबहाराची फळे व आंबिया बहर गळून पडला आहे. झाडांना गारांचा मार बसला त्यामुळे ‘डिंक्या’ रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
>> मुंबईतही धिंगाणा
मुंबई : कमाल-किमान तापमानासह आर्द्रतेमध्ये झालेल्या वाढीचा परिणाम म्हणून शुक्रवारी सकाळी मुंबापुरीला अवकाळी पावसाने झोडपले. तब्बल एक तासाहून अधिक काळ पडलेल्या पावसाची सांताक्रूझ वेधशाळेत १० मिलीमीटर एवढी नोंद झाली. ऐनवेळी दाखल झालेल्या पावसामुळे रस्त्यावरील वाहतूकीचा वेग मंदावला. शिवाय चाकरमान्यांचीही धावपळ उडाली. सकाळच्या पावसानंतर दुपारी पडलेल्या कडक ऊन्हामुळे मात्र मुंबईकर हैराण झाले.
मुंबईकरांची शुक्रवारची पहाटच उजाडली ती आकाशात दाटून आलेल्या काळ्याकुट्ट ढगांनी. सकाळी नऊ वाजेपर्यंत मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगराच्या आकाशात दाटून आलेल्या ढगांनी काळोख केला. त्यातच वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासोबत जमिनीवरील धूळ वातावरणात मिसळली. वारा वेगाने वाहतानाच आकाशात ढगांचा गडगडाट सुरु झाला. असेच काहीसे धूसर झालेले वातावरण मुंबईकरांसाठी अधिकच तापदायक ठरू लागले. ऐन सकाळी वातावरणात होत असलेल्या बदलामुळे मुंबईकरांना पावसाची चाहूल लागते; तोच काही क्षणात दाखल झालेल्या पावसामुळे घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांची धावपळ उडाली. (प्रतिनिधी) मागील दोन दिवसांपासून मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानासह आर्द्रतेतही वाढ झाली आहे. याचा परिणाम म्हणून शुक्रवारी पावसाने मुंबईत हजेरी लावली. पुढील ४८ तासांसाठी मुंबईवरील आकाश अंशत: ढगाळ राहील. शिवाय मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, २४ अंशाच्या आसपास नोंदवण्यात येईल.
- व्ही.के. राजीव,
संचालक, पश्चिम विभाग,
भारतीय हवामान शास्त्र विभाग
>>दुष्काळाचा मुद्दा विधिमंडळात उचलणार! - विखे पाटील
अकोला : दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, यासाठी सरकारकडे कोणतेच धोरण नसल्याची टीका करीत विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुष्काळासह रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसंदर्भात सरकारला जाब विचार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी शुक्रवारी सांगितले. त्यांनी अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला. दुष्काळात शेतकरी, जनता होरपळत असताना, जनतेच्या मागे विश्वासाने उभे राहणे गरजेचे आहे; मात्र मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्याधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करीत असल्याचे टीकास्त्र विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर डागले.
चारा छावण्या बंद; लावण्या सुरू
राज्यात, मराठवाड्यात पाणी, चाऱ्यावाचून गुरे दगावत असताना, राज्य शासनाने चारा छावण्या बंद केल्या असून, डान्स बार सुरू केले आहेत. डान्स बार बंद करण्यास कायद्यात काय बदल करायचे ते करावेत, यासाठी काँग्रेस सरकारच्या सोबत असेल, पण सरकारने या बाबतीत मौन धारण केले असल्याचा आरोप विखे यांनी केला.

Web Title: Poor visionary stops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.