‘लोकशाही देशात झुंडशाही वाढली’
By admin | Published: April 17, 2017 02:56 AM2017-04-17T02:56:26+5:302017-04-17T02:56:26+5:30
लोकशाही असणाऱ्या या देशात झुंडशाही वाढली आहे, अशा व्यवस्थेत ना मुक्तपणे बोलता येत, ना लिहिता येत, ना जगता येत.
औरंगाबाद : लोकशाही असणाऱ्या या देशात झुंडशाही वाढली आहे, अशा व्यवस्थेत ना मुक्तपणे बोलता येत, ना लिहिता येत, ना जगता येत... लोकशाहीने दिलेले हक्क व अधिकार तर आपल्यासाठी नाहीतच, अशी परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांना भेटायला गेल्यावर शिक्षक आणि शेतकऱ्यांना बेदम मारहाण केली जाते. दहशतवाद्यांच्या ताब्यात आहोत की, निर्वासितांच्या छावण्यात राहतोय, हेच कळत नाही, अशी टीका बालाजी इंगळे यांनी केली. दुसऱ्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि शिक्षण विकास मंचतर्फे आयोजित दोनदिवसीय संमेलनास एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात शनिवारी सुरुवात झाली. ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. स्वागताध्यक्ष व आ. विक्रम काळे, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, नंदकिशोर कागलीवाल व अन्य मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठवाड्यातील लेखक आसाराम लोमटे, प्रा. रवी कोरडे आणि डॉ. वीरा राठोड यांचा सन्मान करण्यात आला. तसेच डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार शारदा बर्वे, डॉ. राजा दांडेकर, डॉ. श्रुती पानसे यांना प्रदान झाला. (प्रतिनिधी)