एकही टाका न घालता १५ मिनिटांत छिद्र बंद; ९ महिन्यांच्या चिमुकलीवर हृदय शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 07:59 AM2024-02-11T07:59:26+5:302024-02-11T07:59:50+5:30

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता गुंतागुंतीच्या व जोखमीच्या शस्त्रक्रिया होऊ लागल्याने विदर्भच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यांतून रुग्णांची गर्दी वाढली आहे.

Pore closes in 15 minutes without a drop; Heart surgery on a 9-month-old baby | एकही टाका न घालता १५ मिनिटांत छिद्र बंद; ९ महिन्यांच्या चिमुकलीवर हृदय शस्त्रक्रिया

एकही टाका न घालता १५ मिनिटांत छिद्र बंद; ९ महिन्यांच्या चिमुकलीवर हृदय शस्त्रक्रिया

सुमेध वाघमारे

नागपूर :  अवघ्या नऊ महिन्यांच्या चिमुकलीचे हृदय उघडणे सोडा, एकही टाका न घालता हृदयाचे छिद्र बंद करण्याची यशस्वी प्रक्रिया मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागात पार पडली. एवढ्या कमी वयाच्या मुलीवर झालेली ही पहिलीच प्रक्रिया आहे.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता गुंतागुंतीच्या व जोखमीच्या शस्त्रक्रिया होऊ लागल्याने विदर्भच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यांतून रुग्णांची गर्दी वाढली आहे. विशेषत: हृदयरोग विभाग मध्य भारतातील रुग्णांसाठी आशेचे किरण ठरले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील रहिवाशी असलेली नऊ महिन्यांची चिमुकली मयूरी (नाव बदलेले) हिला जन्मापासून हृदयाला छिद्र होते. याला ‘पेटंट डक्टस आर्टेरिओसस’ (पीडीए) म्हणतात. या आजारामुळे चिमुकलीला श्वास घ्यायला जड जात होते. मयूरीच्या कुटुंबीयांनी गंभीर अवस्थेत १ फेब्रुवारीला तिला हृदयरोग विभागात दाखल केले.

प्रक्रिया यशस्वी
तिच्या हृदयाला ४ ‘एमएम’चे छिद्र होते. डॉक्टरांनी मुलीचे वय पाहता ‘ओपन हार्ट सर्जरी’ न करता ‘डिव्हाइस प्रोसिजर’ करण्याचा निर्णय घेतला. ७ फेब्रुवारीला ही उपचार प्रक्रिया यशस्वी झाली. अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्या मार्गदर्शनात विभागप्रमुख डॉ. पी.पी. देशमुख यांच्या पुढाकारात डॉ. सुनील वाशिमकर व डॉ. अतुल राजपूत यांनी उपचार केले. 

‘डिव्हाइस क्लोजर’
डॉ. देशमुख यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ‘मयूरी’च्या जांघेतील धमनीत एक बारीकसे छिद्र करून कॅथेटरच्या साहाय्याने हृदयाचे छिद्र बंद केले. या उपचार पद्धतीला ‘डिव्हाइस क्लोजर’ म्हणतात. यासाठी केवळ १५ मिनिटांचा वेळ लागला. 

सुपर स्पेशालिटीमध्ये पहिल्यांदाच एवढ्या कमी वयाच्या मुलीवर ‘डिव्हाइस क्लोजर’ उपचार पद्धतीचा वापर करण्यात आला. -डॉ. पी.पी. देशमुख, प्रमुख हृदयरोग विभाग, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

Web Title: Pore closes in 15 minutes without a drop; Heart surgery on a 9-month-old baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.