खासगी जागेत अश्लील कृती गुन्हा ठरत नाही - मुंबई उच्च न्यायालय
By Admin | Published: March 20, 2016 02:22 PM2016-03-20T14:22:57+5:302016-03-20T14:22:57+5:30
फ्लॅटमध्ये महिलेबरोबर अश्लील वर्तन केल्या प्रकरणी तेरा जणांविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन रद्द करण्यात आला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - फ्लॅटमध्ये महिलेबरोबर अश्लील वर्तन केल्या प्रकरणी तेरा जणांविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन रद्द करण्यात आला आहे. भारतीय दंड विधान संहितेर्गत खासगी जागेत केलेली अश्लील कृती गुन्हा ठरत नाही असा उच्च न्यायालयाने सांगितले.
मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात अंधेरी पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी १३ जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायाधीश एन.एच.पाटील आणि न्यायाधीश ए.एम.बदर यांनी या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला.
१२ डिसेंबर २०१५ रोजी एका पत्रकाराने पोलिसांकडे शेजारच्या फ्लॅटमध्ये मोठया आवाजात म्युझिक वाजवले जात असून, तोकडया कपडयांमध्ये नृत्य करणा-या महिलांवर पैसे उडवले जात असल्याची तक्रार केली.
तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी फ्लॅटवर धाड टाकली त्यावेळी तिथे सहा महिला तोकडया कपडयांमध्ये नृत्य करत होत्या आणि तेरा पुरुषांनी मद्यपान केले होते. पोलिसांनी सर्व पुरुषांना अटक करुन त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. फ्लॅट सार्वजनिक स्थळ नाही. तिथे कोणीही येऊ शकत नाही असा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांनी केला. न्यायालयाने हा युक्तीवाद मान्य करुन एफआयआर रद्द करण्याचा आदेश दिला.