"नव्या मंत्र्यांना २-३ दिवसांत खातेवाटप; सरकार डबल स्पीडनं काम करणार"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 01:36 PM2022-08-09T13:36:50+5:302022-08-09T13:55:05+5:30
तांत्रिकदृष्ट्या विस्ताराला विलंब झाला असला तरी आता राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे असं मंत्री गिरीश महाजनांनी सांगितले.
मुंबई - राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला. भाजपाचे ९ आणि शिंदे गटाच्या ९ आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळातील एका नावानं गदारोळ माजला आहे. संजय राठोड यांना मंत्रिपद दिल्यानंतर विरोधकांसह भाजपा महिला नेत्यानेही नाराजी व्यक्त केली आहे. परंतु संजय राठोड यांना मंत्री बनवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आहे असं सांगत मंत्री गिरीश महाजनांनी या वादातून हात झटकले आहेत.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, चित्रा वाघ यांनी जे मत व्यक्त केले ते त्यांचे वैयक्तिक आहे. त्या आधीपासून या प्रकरणात मत मांडत आहेत. या प्रकरणाची चौकशी झाली आहे. काही सुरू आहे. प्रथमदर्शनी राठोडांबाबत स्पष्टता आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे. अब्दुल सत्तारांवरही आरोप झाले. त्यांनीही कुणाच्या माध्यमातून चौकशी करा असं सत्तार म्हणाले आहेत. त्यामुळे चौकशीनंतर जो काही निर्णय आला, स्पष्टता आली तर मुख्यमंत्री शिंदे त्यावर निर्णय घेतील असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच तांत्रिकदृष्ट्या विस्ताराला विलंब झाला असला तरी आता राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. त्यामुळे सरकार वेगाने काम करेल. जुने, नवे अनुभवी सगळ्यांचा ताळमेळ घालून पक्षश्रेष्ठीने निर्णय घेतला आहे. उद्या कॅबिनेट आहे. जो अडीच वर्षाचा बॅकलॉग आहे तो भरून काढण्यासाठी डबल स्पीडने काम करावं लागेल. आता केंद्र आणि राज्यात आमची सत्ता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त निधी आणून विकासकामांना गती देता येईल. आम्हाला विकासाचा वेग भरून काढायचा आहे. त्याचसोबत २-३ दिवसांत खातेवाटप होईल असंही गिरीश महाजनांनी सांगितले.
चित्रा वाघ यांची नाराजी
"पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रिपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी" असं भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. लडेंगे… .जितेंगे असंही त्यांनी सांगितलं. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रिपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास. लडेंगे….जितेंगे" असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
अधिवेशनानंतर पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार
आज शपथ घेतलेल्या सर्वांनाच कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे. यातच, या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपद न मिळाल्याने औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, आता त्यांनी स्वतःच यावर भाष्य करत, "प्रत्येकाला वाटते, की मी मंत्री झालो पाहिले. तेसे मलाही वाटतेना. पण याचा अर्थ असा नाही, की मी नाराज आहे. आमचा शिंदे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, आपण नाराज नाही," असे शिरसाट यांनी म्हटले आहे.